पुणे : विद्यार्थ्यांच्या मागण्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्याय द्या; महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा थेट इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दिला. आंदोलनात कोणताही कलंक लागू नये, याची काळजी घ्या. प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच मुंबईला जाणार असून, महिलांची संख्या मोठी राहणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जरांगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, सरकारने हा राजकीय विषय करू नये. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा. जातीच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. आम्ही जातीचे राजकारण करण्यासाठी येथे आलेलो नाही. सरकारने विद्यार्थ्यांचे मन जिंकले पाहिजे. फडणवीस यांनी प्रवक्त्याची भूमिका न घेता विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारला गरिबांच्या लेकरांचा इतका तिरस्कार का? सत्ता हातात आल्यानंतर इतकी मस्ती आली आहे का? मात्र, गरीब जनतेत सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध तुटू देऊ नका.

आंदोलनात कोणताही कलंक लागू नये, याची काळजी घ्या. तुम्हाला शिकायला पाठवले आहे. तुमच्या मागे राजकारणातील मुरब्बी लोक उभे आहेत, हे तुमचे नशीब आहे. संधीचे सोने करा. अन्याय करणारा कोणताही पक्ष असो, त्याला मी सोडणार नाही. राज्य सरकारच्या धोरणांमुळे हातगाडीवाला, पाणीपुरीवाला, उद्योजक, नोकरदार बेजार झाला आहे. शेतात पाणी नाही, दुष्काळाची परिस्थिती आहे. येथे कोणीही सुखी नाही. सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. मोठा उठाव करण्याची वेळ आली आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने पुण्यातील नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल येथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अशा अनेकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली आहे.