पुणे : वैचारिक पुस्तकांच्या निर्मितीने मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर (वय ७३) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. पाटकर यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकर यांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली होती. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. त्या टप्प्यावर अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांनी त्यांना मोलाची मदत केली.
पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकर यांना आधीपासूनच होता. त्याच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली.
पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर ४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. भट यांच्या पाठिंब्याने ‘शाहीर’ हे मनोविकास प्रकाशनचे पहिले पुस्तक १९८५ मध्येप्रकाशित झाले. त्यानंतर वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००५ पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांनी प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले. प्रकाशन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा राज्य सरकारने श्री. पु. भागवत पुरस्काराने गौरव केला होता.
‘मनोविकास प्रकाशन’ हे नावही एका सहजसुंदर क्षणातून साकार झाले. कोकणातील कुडाळ येथे पुस्तक प्रदर्शनासाठी गेले असताना शेजारी राहणाऱ्या बबन पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ हे नाव सर्वसामान्य वाटते असे सांगत त्यामागे ‘मनो’ जोडण्याची सूचना केली. त्यातूनच ‘मनोविकास प्रकाशन’ या नावाचा जन्म झाला.

