पुणे : तब्बल साडेसहा महिन्यांनंतर शहरातील हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्ष हॉटेल सुरू करण्यामध्ये मनुष्यबळाची अडचण भासणार आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यासाठी एक लाख कामगारांची आवश्यकता असताना सध्या जेमतेम सहा ते सात हजार कर्मचारी उपलब्ध आहेत. हॉटेल व्यवसायाचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी किमान १५ ऑक्टोबपर्यंत वाट पहावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला. तब्बल साडेसहा महिन्यांच्या खंडानंतर सोमवारपासून (५ ऑक्टोबर) हॉटेल आणि परमिट बार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी हॉटेलच्या जागेचे भाडे आणि मनुष्यबळाची कमतरता हे कळीचे मुद्दे हॉटेलचालकांना भेडसावणार आहेत, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

शेट्टी म्हणाले, हॉटेल सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी मार्गदर्शक सूचना अद्याप आलेल्या नाहीत. ८५० हॉटेल व्यावसायिक संघटनेचे सभासद असून त्यापैकी ७०० हॉटेल भाडेतत्त्वावरील जागेमध्ये कार्यरत आहेत. जागामालकांबरोबर भाडय़ाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर हॉटेल सुरू होतील. करोना सुरू होण्यापूर्वी हॉटेलमध्ये सुमारे अडीच लाख कर्मचारी कार्यरत होते. सध्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यासाठी किमान एक लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, परप्रांतीय कर्मचारी गावी निघून गेल्यामुळे हॉटेल सुरू करताना मनुष्यबळाची कमतरता भेडसावणार आहे. राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी नियमावली ठरविण्याचे अधिकार महापालिकेकडे दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत असल्याचे ‘किमया रेस्टॉरंट’चे मालक भूपाल पटवर्धन यांनी सांगितले. आमच्याकडे ४५ कर्मचारी होते. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या २० कर्मचाऱ्यांच्या मदतीने हॉटेल सुरू करणार आहे, असे ते म्हणाले.

ग्राहक किती येतील हा प्रश्नच

सध्या पार्सल सेवा उपलब्ध असताना त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हॉटेल सुरू केले तरी ग्राहक किती प्रमाणात येतील हा प्रश्नच आहे, याकडे ‘दुर्वाकूर डायनिंग हॉल’चे मालक श्याम मानकर यांनी लक्ष वेधले. ९० पैकी ३० कर्मचारी सध्या पार्सल सेवेमध्ये असल्याने हॉटेल सुरू करण्यामध्ये अडचण येणार नाही. मात्र, रेल्वे सुरू नसल्याने परप्रांतीय कर्मचाऱ्यांपेक्षा कोकण आणि मराठवाडय़ातील कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे, असे मानकर यांनी सांगितले.

पुण्यातील हॉटेलमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड येथील आचारी आहेत. या राज्यातील रेल्वेची सेवा सुरू झालेली नसल्यामुळे परप्रांतीय ३०० आचाऱ्यांना पुण्यामध्ये पोहोचण्यासाठी विमानाचे तिकीट पाठविण्यात आले आहे.

गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन