पुणे : मराठा समाजातील विवाह सोहळा आणि सोहळ्यानंतरची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या आचारसंहितेचे पालन करण्याची शपथ बुधवारी मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच, आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून समन्वय साधण्यात येणार आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सकल मराठा समाजाची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामध्ये काही ठराव करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा बैठक झाली. या बैठकीमध्ये विवाह सोहळा आणि त्यानंतरची आचारसंहिता निश्चित करण्यात आली. माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, माजी महापौर कमल व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते.
हुंडा देणार आणि घेणार नाही, ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो, तसेच हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार समाज करणार नाही. तसेच, त्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती श्रीकांत शिरोळे यांनी दिली. विवाह ठरविताना दोन्ही कुटुंबांच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जाईल. प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील. त्या दृष्टीने सातत्याने जनजागृती केली जाईल. आदर्श विवाह करणाऱ्या कुटुंबाचा गौरव करण्यात येईल. या सर्व बाबी अमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तींची समिती किंवा मंडळ स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
विवाह सोहळ्याची आचारसंहिता
– सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, तर माहेरचे लोक त्याविरोधात ठामपणे उभे राहतील.
– कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील.
– मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणार नाही. जावयाचा मान कौटुंबिक स्वरूपात केला जाईल.
– सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य.
– विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाचे भाषण देईल.
– विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये होईल.
– अनावश्यक खर्च टाळून वधू-वरांच्या नावे ‘एफडी’ केली जाईल; तसेच गरजवंतांना मदत केली जाईल.
– वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील बीभत्स नृत्यासह फटाके वाजविण्यास बंदी.
– प्री-वेडिंग शूटला बंदी.
– विवाह सोहळ्याचा खर्च विभागून.