scorecardresearch

Premium

“महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे”, नाना पाटेकरांनी खडसावलं; म्हणाले “ते महाराज…”

“महाराजांचे नुसते पुतळे उभारु नका”, राजकीय नेत्यांसमोर नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत

Marathi Actor Nana Patekar, Chhatrapati Shivaji Maharaj Statue, नाना पाटेकर, छत्रपती शिवाजी महाराज
"महाराजांचे नुसते पुतळे उभारु नका", राजकीय नेत्यांसमोर नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपा नेते गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अभिनेते नाना पाटेकरदेखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणादरम्यान राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले. आम्ही मत दिलं असल्याने आमची कामं करावीच लागणार आहेत अशा शब्दांत त्यांनी परखड मत मांडलं. यावेळी त्यांनी महराजांचे नुसते पुतळे उभारु नका तर त्यांचे विचारही आत्मसात करा असा सल्ला दिला.

मी गिरीश बापट यांना एकेरी हाक मारतो सांगताना नाना पाटेकर यांनी हा दादा तो दादा, शरदराव, उद्धवराव हे सगळेच माझे आहेत. आता तुम्ही सर्वांनी वेगळे पक्ष स्थापन केले त्याला मी काय करायचं अशी मिश्कील टिप्पणी केली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

‘…म्हणून जाहीर टीका करणं टाळतो’

“नाम संस्थेची स्थापना झाली तेव्हा कोणावरही टीका करण्याचं मी टाळतो. वैयक्तिक भेट झाल्यावर आवडलं नाही असं सांगतो. कारण ‘नाम’च्या माध्यमातून करता आलं तेवढं काम मला कधीच करता आलं नाही. ५० वर्षांपासून मी चित्रपट, नाट्यसृष्टीत आहे पण गेल्या सात वर्षात ‘नाम’च्या माध्यमातून काम करताना नट म्हणून जे सन्मान मिळाले त्यापेक्षा ‘नाम’च्या कामातून मिळालेलं समाधान मोठं आहे. त्यामुळे मी कोणावरही जाहीर टीका करत नाही,” असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

“महाराजांचे पुतळे उभारणं सोपं आहे”

“महाराजांचे पुतळे उभारणं सोपं आहे. त्यांची विचारसरणी, विचारांचं अनुकरण करण्यासाठी एक पाऊल जरी टाकता आलं तरी मोठं आहे. जय भवानी, जय शिवाजी बोलणं खूप सोपं आहे. महाराजांनी सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं. प्रत्येकाला सामावून घेण्याची त्यांची ताकद होती. योग्यतेपेक्षा फार मोठं त्यांनी प्रत्येकाच्या पदरात टाकलं,” असं नाना पाटेकर म्हणाले.

“महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे”

पुढे बोलताना त्यांनी आपण सर्व दैवतं वाटून घेतल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “आपण सर्वांनी दैवतं वाटून घेतल्याचं फार वाईट वाटतं. महाराज, आंबेडकर, टिळक माझेच आहेत. इतिहासाचा चांगला भाग घ्यावा आणि इतर काढून टाका. ब्राह्मण, ब्राह्मणेतर हा वाद आता नको. माणूस म्हणून एकमेकांना ओळखू तेव्हाच या पुतळ्याचा आदर होईल. येता जाता रस्त्यात कुठलाही पुतळा उभा आहे असं नाही. ते महाराज आहेत. महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे. त्याच्यावरुन वाद का होतात हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे”.

“प्रार्थना म्हणतो तेव्हा त्यातून समाधान मिळतं, कोणताही मोबदला नसतो. हे स्मारक आपली प्रार्थना आहे. ही तुमच्या समाधानासाठी आहे. त्यांचे विचार तुम्ही घेतलेर त्याचा अर्थ आहे. नाही तर इतर पुतळ्यांप्रमाणे हादेखील एक पुतळा होईल. यावरुन सलोखा वाढला पाहिजे, भांडणं नाही,” असं नाना पाटेकर म्हणाले.

“काही तथाकथित विद्वान आणि काही राजकारणी मंडळींनी महाराजांचा इतिहास त्यांच्या स्वार्थासाठी वेगवेगळा मांडला आहे. आपण सर्वजण शिक्षित असून त्याची नेमकी माहिती असली पाहिजे,” असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. आपल्या हातून समाजपयोगी गोष्टी झाल्या पाहिजेत, नुसते पुतळे उभारणं नाही असंही स्पष्ट मत यावेळी त्यांनी मांडलं.

“विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनाही आम्ही मत दिलंय”

“आम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोघांनाही मतं दिलेली असतात. त्यामुळे दोघांची जबाबदारी असून मत दिलं असल्याने आम्हाला बोलण्याचा हक्क आहे. आम्हाला फक्त एक दिवस नाही तर रोज हक्क असून आमच्या हिताची कामं करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिलं आहे. सरकार कोणतंही असो त्याच्याशी काही देणंघेणं नाही. इतकी वर्ष तुम्ही निवडून येत आहात त्यासाठी काही तरी कारण असेलच ना. मी काही भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसचा नाही. तुम्ही केलंच पाहिजे, आणि ते नाही केलं तर मी धरणार. तो आम्हा जनतेचा हक्कच आहे. आमच्या दैवंताची स्मारकं उभारता तसंच आमच्या सोयींसाठी काम केलं पाहिजे,” असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

“इतिहासाच्या नावखाली काही नतद्रष्ट विकृतीचे रंग पेरत असतात. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या द्वेषावर आधारित नसावा. मी जन्माने हिंदू असून मरणारही हिंदू आहे. पण मी इतर धर्मांचाही आदर करतो,” असं सांगताना नाना पाटेकरांनी महाराजांचा इतिहास वाचा असा सल्ला दिला. अफझलखानाला मारलं हा इतकाच इतिहास नाही. इतिहास तिथून सुरु होतो असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

“अन्न, वस्त्र, निवारा मिळेल तेव्हा विचार प्रत्येकजण विचार करु लागेल आणि तेव्हा कोणाला मत द्यायचं हे कळेल. मी कोणत्याही प्रकारचा दागिना अंगावर घालत नाही कारण मी तुमच्यातील एक आहे. आपण एखाद्याच्या भूमिकेतून जातो तेव्हा त्या वेदना वैगेरे कळण्यास मदत होते,” असं नानांनी यावेळी सांगितलं.

“निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही माझ्या गोष्टी केल्याच पाहिजेत”

“निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही माझ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तुमचे कपडे मळलेले पाहिजेत. तुमच्या कपड्याला घामाचा घाण वास आला पाहिजे. हातात भाकरीचा तुकडा ठेवला तर तो गिळायची सवय पाहिजे. निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फकीर असं पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं,” असं नाना पाटेकरांनी यावेळी मंचावर उपस्थित नेत्यांना सांगितलं. सातबाऱ्यावर जमिनी नाही, तर माणसं वाढली पाहिजेत असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

“मी मुलगा मल्हारला शेतात मला कुठे जाळायचं ती जागा दाखवून ठेवली आहे. तिथे सुकी लाकडं जमा करुन ठेवली आहेत. ओल्या लाकडात जाळल्यावर धूर येईल आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. मरताना, जळताना मला ते माझ्यासाठी रडत आहेत असं वाटेल. निदान मरताना तरी मला गैरसमजात मरायचं नाही,” असं मिश्कील भाष्य नाना पाटेकरांनी केलं.

“पक्ष बदलणाऱ्याला पाच वर्ष कोणतंही पद देऊ नका”

“पक्ष बदलणाऱ्याला पाच वर्ष कोणतंही पद देऊ नका, एकही माणूस पक्ष बदलणार नाही. पण आमच्याकडे तसे नियमच नाहीत. दरवर्षी मी निवडणुकीत निवडून आलो, आमदार, मंत्री झाल्यानंतर पुढील वर्षी माझी संपत्ती किती हे दिसायलाच पाहिजे. निवडून येण्याआधी ५० आणि नंतर १५० किलो वजन का झालं? हा प्रश्न विचारायला पाहिजे,” असं नाना पाटेकर म्हणाले.

तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील चांगल्या लोकांनी एकत्र या आणि एक वेगळा पक्ष स्थापन करा असा सल्ला नाना पाटेकरांनी देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आम्ही मत दिलं असून फक्त आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी याचना करावी लागू नये याची काळजी घ्या असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor nana patekar chhatrapati shivaji maharaj statue in pune sgy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×