राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काही तासांपूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केतकी चितळे हिला कळंबोली येथील राहत्या घरातून अटक केली आहे. कळंबोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात आणलं होतं. दरम्यान तिला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करत असताना, तिच्यावर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून शाही फेकण्यात आली.

केतकी चितळे सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. पण आता तिच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे. ठाणे आणि पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही केतकीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल. आतापर्यंत केतकी चितळे विरोधात महाराष्ट्रात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात केतकीसह वकील नितीन भावे यांचा समावेश आहेत.

केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती. बदनामीकारक आणि मानहानीकारक ही पोस्ट असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता आल्हाट यांनी केली होती. त्यानुसार पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्रसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने केतकीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.