पुणे : कोणताही कौटुंबिक लष्करी वारसा नसताना जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) प्रवेश मिळवून तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करतानाच सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी पदक मिळवण्याची दमदार कामगिरी तीन छात्रांनी केली. त्यात पुण्याच्या विश्वेश भालेराव या छात्राचाही समावेश असून, या छात्रांच्या कामगिरीचा त्यांच्या कुटुंबीयांनाही अभिमान आहे.
‘एनडीए’च्या १४९ व्या तुकडीचा दीक्षांत कार्यक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांच्या उपस्थितीत झाला. त्यात कार्तिक माहेश्वरी याला विज्ञान शाखेचे रौप्य पदक, अनन्या बालोनी हिला संगणक विज्ञान शाखेचे रौप्य पदक, अनुराग गुप्ता याला कला शाखेचे रौप्य पदक, विश्वेश भालेराव याला बी. टेक शाखेतील रौप्य पदक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमानंतर छात्रांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अनन्या बालोनी म्हणाली, आमचे कुटुंब मूळचे उत्तराखंड येथील आहे. मात्र, आता फरिदाबाद येथे वास्तव्य आहे. शालेय शिक्षण फरिदाबाद येथे झाले. वडिलांचा व्यवसाय आहे, तर आई गृहिणी आहे. माझ्या कुटुंबातील कोणीही लष्करात नाही. ‘एनडीए’तील तीन वर्षे अवर्णनीय होती. रोज काहीतरी नवीन शिकता आले. प्रशिक्षणानंतर स्वत:मध्ये पूर्णपणे बदल झाला आहे. प्रशिक्षण मुला-मुलींसाठी सारखेच खडतर होते. मात्र, सर्व छात्रांना मार्गदर्शकांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले. लहानपणी सैन्यातील अधिकारी पाहायचे, तेव्हा आपणही लष्करी अधिकारी व्हावे, असे वाटायचे. ‘एनडीए’मध्ये मुलींना प्रवेश देण्यास सुुरुवात झाल्यावर प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. स्वत:वर विश्वास असल्यास करिअरसाठी नक्कीच सैन्याचा विचार करावा.
कार्तिक माहेश्वरी हा देखील मूळचा उत्तराखंडमधील हल्दवानी येथील आहे. त्याचे शालेय शिक्षण हल्दवानी येथेच झाले. त्याच्या वडिलांचा व्यवसाय आहे, तर आई शिक्षिका आहे. त्यालाही लष्करी पार्श्वभूमी नाही. कार्तिक म्हणाला, ‘एनडीए’मध्ये कडक शिस्त असल्याने सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. मात्र, शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांमुळे कालांतराने या वातावरणात मिसळून गेलो. लहानपणापासून सैन्याविषयी आदर, आकर्षण होते. त्यामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा दिली. ‘एनडीए’मधील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणामुळे अंतर्बाह्य बदललो.
पुण्याच्या विश्वेश भालेरावचे आई-वडील, मोठी बहीण डॉक्टर आहेत. त्याचे शिक्षण पुण्यातच डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये झाले. ‘आमच्या घरातून लोहगाव विमानतळावरून उडणारे सुखोई विमान दिसायचे. ते पाहून मला प्रेरणा मिळाली. अकरावी-बारावीत असताना ‘एनडीए’मध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले. लष्करी पार्श्वभूमी नसल्याने एनडीएतील वातावरणाची कल्पना नव्हती. ‘एनडीए’त येण्यापूर्वी इतके शारीरिक कष्ट, शिस्तीचा अनुभव नव्हता. मात्र, प्रशिक्षकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. सैन्यदलाबद्दल कुतूहल निर्माण झाल्यास या क्षेत्राची आवड निर्माण होईल. या आवडीला करिअरमध्ये रूपांतर करायचे ठरवल्यास एनडीएमध्ये मराठी मुलांचा टक्का आणखी वाढेल, असे विश्वेशने सांगितले.
विश्वेशला लहानपणापासूनच विमाने, गाड्यांचे आकर्षण होते. त्याला वैमानिक होण्याची इच्छा होती. पालक म्हणून आम्ही त्याच्या आवडीला पाठिंबा दिला. त्याने एनडीएसाठी तयारी करायचे ठरवले, तेव्हा आम्ही परिचितांकडून माहिती घेतली. निवड झाल्यानंतर एनडीएतील खडतर प्रशिक्षण त्याने पूर्ण केल्याचा आनंद आहे. प्रशिक्षणादरम्यान एकदा दुखापत होऊनही त्याने हार मानली नाही. त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, अशी भावना विश्वेशचे पालक डॉ. स्वाती आणि डॉ. नितीन भालेराव यांनी व्यक्त केली.
