आशिया खंडातून ऑस्ट्रेलियात आयात केल्या जाणाऱ्या फळासंबंधीच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्यामुळे हापूस व केशर आंबा आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातील आंब्यांचा हंगाम संपला असून महाराष्ट्रातील हापूस आंब्याला मागणी वाढली आहे. जेजुरी येथील फळांचे निर्यातदार उन्मेश बारभाई यांनी पाच कंटेनर आंबा ऑस्ट्रेलियात पाठवला.

बारभाई हे ऑस्ट्रेलियात आंबा निर्यात करणारे पहिले निर्यातदार ठरले आहेत. त्यांनी पाठवलेल्या देवगड हापूसची ऑस्ट्रेलियात हातोहात विक्री झाली. तेथील मराठीजनांनी प्रामुख्याने हापूस आंब्याला पसंती दिली. तेथे आंब्याची विक्री करणारे सुनील बारभाई हे मूळचे जेजुरीचे असून तेथील एका कंपनीमध्ये ते काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे तेथे वास्तव्य आहे. ते व त्यांची पत्नी तनुजा दोघेही नोकरी करतात. नोकरी करत असताना त्यांनी व त्यांचे तेथील मित्र विनीत पसरणीकर (वाई) यांनी हरि ॐ फुड्स या नावाने व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून ते पुण्यातील चितळे बंधू, सकस, प्रकाश मसाले, सिंगापूर येथील पेशवाई, मराठा दरबार यांच्या उत्पादनांची विक्री करतात. हा व्यवसाय करत असताना आपल्याला येथे हापूस आंबा विकता येत नाही याची खंत त्यांना वाटायची.

दोन महिन्यांपूर्वी तेथील सरकारने काही अटींवर आंबा आयातीला परवानगी दिली. तेथील भारतीय ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन हापूस आंबा विक्री करण्याचा निर्णय सुनील बारभाई आणि पसरणीकर यांनी घेतला. लगेच त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची पूर्तता करून जेजुरीतील उन्मेश बारभाई यांच्याशी संपर्क साधला.

परदेशात आंबा पाठवण्याची संधी मिळतेय याचा आनंद उन्मेश बारभाई यांना झाला. त्यांनी तातडीने आंबा मुंबईतून हवाईमार्गे ऑस्ट्रेलियात पाठवला. तेथे सुनील बारभाई यांनी त्या पेटय़ा घरी नेऊन कोकणचा आंबा आल्याची वार्ता सर्वत्र दिली. ही वार्ता समजताच तेथील भारतीयांच्या विशेषत: मराठीजनांच्या कोकणच्या आंब्यावर उडय़ा पडल्या आणि सर्व पेटय़ा संपल्या. मागणी जास्त असल्याने आणखी दहा कंटेनर आंबा मागवण्यात आला आहे.

‘‘परदेशात आपला माल निर्यात करणे खूप अवघड असते. परंतु उन्मेश बारभाई यांच्यासारख्या उत्साही तरुण व्यावसायिकाने आंबा निर्यात केला. ऑस्ट्रेलियातील मराठी बांधवांना हापूस आंबा सर्वप्रथम देण्याचा मान मराठी माणसाला मिळाला याचा आनंद वाटत आहे,’’ अशी प्रतिक्रिया सुनील बारभाई यांनी व्यक्त केली.

Story img Loader