बालपणापासून प्रत्येकाचाच कथेशी संबंध येत असतो. लहानपणी गोष्ट सांगणारी आई, आजी, आजोबा हे घरातील सदस्य मुलांना म्हणूनच आपलेसे वाटतात. ‘एकदा काय झालं…’ असं म्हणून गोष्ट सुरू झाली, की ती ऐकण्यामध्ये बाळगोपाळ रममाण होतात. रामायण, महाभारत हे ग्रंथ या मूळ कथाच आहेत.
गोष्टीच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट लवकर समजते, हे खरे त्यामागचे इंगित. ‘राजा-राणीची नको, चिऊ-काऊची नको, गोष्ट मला सांग आई रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची’ या लोकप्रिय बालगीतातून गोष्ट सांगण्याचा हट्ट धरणारे बालक आपल्या डोळ्यांसमोर येते. ‘दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरूनी लोण्याचा गोळा’ किंवा ‘ससा तो ससा, की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली’ अशा बालगीतांतून गोष्टच सांगितली गेली आहे.
अशा गोष्टीवेल्हाळ जगात चांगली गोष्ट सांगणारे असले, की ऐकणारे चांगले कानही आपसूक तयार होतात. गोष्टी रंगवून सांगणारे तसे विरळाच आणि अलीकडे मराठीत तर सध्या त्यात कमतरता आहे. अशा वेळी मराठीतील तीन महत्त्वाच्या कथाकथनकारांची शताब्दी सुरू असताना कथाकथनाच्या या कलेबद्दल बोलणे निश्चितच औचित्याचे.
कथाकथनकार शंकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. तर, व्यंकटेश माडगूळकर आणि प्रा. द. मा. मिरासदार या श्रेष्ठ लेखकांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरू झाले. मुख्य म्हणजे या तिघांनी एकत्रितपणे कथाकथन करून मराठी कथा श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या. एवढेच नव्हे, तर कथाकथन या प्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली.
साठोत्तरी कालखंडात एक काळ असा होता, की गावोगावी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांचे कथाकथनाचे कार्यक्रम, तर प्रा. वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांचे कवितावाचनाचे कार्यक्रम सादर होत असत. या दोन्ही ‘त्रिमूर्तीं’नी कथा आणि कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
पाटील, माडगूळकर आणि मिरासदार या कथाकथनरूपी त्रिदेवांमुळे कथाकथनाला रंगमंचीय अभिव्यक्ती लाभली. याच मळलेल्या वाटेवरून पुढे अनेकांनी प्रवास केला. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या तिघांनीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. माडगूळकर यांच्या ‘सत्तांतर’ या साहित्यकृतीला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला, तर विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्काराचे तिसरे मराठी मानकरी ठरले.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि वाचकप्रिय लेखक व. पु. काळे यांनीही कथाकथन प्रकार लोकाभिमुख केला. विनोदाच्या अंगाने कथांची मांडणी करत सहज संवादी शैलीतून कथा सादरीकरणाच्या शैलीचा मराठी रसिकांवर परिणाम झाला. वाचनाचा आनंद स्वान्तसुखाय असतो.
पण, कथाकथन हा प्रकार एकाच वेळी अनेकांना खिळवून ठेवणारा असल्याने प्रभावी ठरतो. त्याची दखल घेऊन दर वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कथाकथनाचे एक सत्र जाणीवपूर्वक राखून ठेवले जाते. पुण्यातही विविध संस्था कथाकथन स्पर्धांचे आयोजन करतात. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने विविध वयोगटांतील मुला-मुलींसाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले जाते. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी श्रुतिका हा एक प्रकारचा कथाश्रवणाचाच भाग.
आता काळ बदलल्याने सर्वच गोष्टी गतिमान झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय, कथाकथनाची जागा ‘स्टँडअप काॅमेडी’ या प्रकाराने घेतली. थोडक्या वेळात विनोदाची पखरण करून विविध विषयांची मांडणी करणारे अनेक कलाकार या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करतात. याहीशिवाय काही चांगले नवे प्रयोग होतात. ‘गोष्ट इथे संपत नाही’ हा सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांचा ऐतिहासिक कथाकथन कार्यक्रम त्यापैकीच.
कथा म्हणजे गोष्ट ही अशी आपल्या सर्वांच्या जीवनात अढळ स्थानी जाऊन बसली आहे. वाचनातून कथा समजते ती त्या कथेच्या वाचनाचा आनंद घेणाऱ्यालाच. पण, कथाकथन सामूहिक अनुभूती देते. त्याचे रूप आता बदलले असले, तरी त्याची सांस्कृतिक गरज अबाधित आहे. म्हणूनच ‘गोष्ट संपत नाही’ हेच खरे आहे….
vidyadhar.kulkarni@expressindia.com
