जगभरातील मराठी भाषक आणि साहित्यप्रेमींपर्यंत साहित्य संमेलनाची संपूर्ण माहिती पोहोचविणाऱ्या मराठी साहित्य गौरव ई-बुकचे प्रकाशन रविवारी झाले. डेलीहंट या ई-बुकची निर्मिती करणाऱ्या संस्थेतर्फे या ई-बुकची निर्मिती करण्यात आली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ फाउंडेशनतर्फे पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर या ई-बुकचे प्रकाशन सीड इन्फोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, प्रसिद्ध कवी अरुण शेवते, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, डेलीहंट संस्थेच्या अंजली देशमुख, तंत्रज्ञ प्रतीक पुरी या वेळी उपस्थित होते.
या ई-बुकमध्ये ८९ व्या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या आयोजक संस्थेची माहिती, आजवरच्या ८८ संमेलनांचा इतिहास, आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ओळख अशी सुमारे दोनशेहून अधिक पृष्ठांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. मराठी वाचक हा साहित्यप्रेमी आणि जिज्ञासू असल्याने जगभरातील किमान १५ टक्के लोक ई-बुकवरून नक्की संमेलनाविषयी जाणून घेतील, अशी माहिती अंजली देशमुख यांनी दिली. ई-बुकमुळे हे संमेलन जगभरात पोहोचणार असून खऱ्या अर्थाने मराठी पाऊल पडते पुढे, असेच म्हणता येणार असल्याचे माधवी वैद्य यांनी सांगितले.
धमकावण्याच्या प्रवृत्तीचा निषेध ठराव?
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना ज्या पद्धतीने संपविण्यात आले आणि आता श्रीपाल सबनीस यांना धमकावले जात आहे, अशा वृत्तीचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनात मांडणार. मात्र, त्याआधी तो ठराव मान्यतेसाठी साहित्य महामंडळाच्या नियामक मंडळासमोर मांडणार असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, सबनीस यांनी पंतप्रधानांसंदर्भात केलेल्या वक्तव्याशी महामंडळाचा संबंध नसल्याचे सांगताना ‘ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.