मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळावे

‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही,

‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते. अगदी छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते. तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे,’ असे मत ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या गुंतवणूकविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात तज्ज्ञांनी मंगळवारी व्यक्त केले.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, नातू-परांजपे – ईशान ड्रीम बिल्डर्स प्रा. लि. आणि कोटक म्युच्युअल फंड सहप्रायोजक असलेल्या व ‘एनकेजीएसबी’चे पाठबळ लाभलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ हा गुंतवणूकविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे मंगळवारी झाला. या वेळी वित्तीय सल्लागार गणेश कळसकर, कोटक म्युच्युअल फंडच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लक्ष्मी अय्यर, प्राप्तिकर उपायुक्त सुहास कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणेकरांनी या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी केली होती. अगदी दुपारपासून या कार्यक्रमासाठी श्रोते कार्यक्रमस्थळी येऊ लागले होते. विद्यार्थ्यांपासून  अगदी ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील श्रोत्यांचा त्यात समावेश होता. गुंतवणूकविषयक शंका, करातून परतावा कसा मिळवावा अशा अनेक मुद्दय़ांवर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनीही मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
या वेळी गणेश कळसकर म्हणाले, ‘स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय आहे.  जमीन खरेदीतील गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. पण कर्ज काढून घेतलेली स्थावर मालमत्ता गुंतवणूक म्हणून चांगली नाही. बँकेत ठेवी ठेवताना आपण चलनवाढीचा विचार करत नाही. गुंतवणुकीवर चलनवाढीचा परिणाम होणार नसेल, तरच ती गुंतवणूक चांगली समजावी. सोन्याच्या दागिन्यांमधील घट आदी गोष्टी जमेस धरल्या, तर दागिने हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय नाही. शेअर बाजाराचा चांगला अभ्यास करून त्यात पैसे गुंतवता येतील. मात्र कोणत्याही एकाच प्रकारची गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळ्या स्वरूपातील विभाजीत गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे.’
‘आजपासून साधारण वीस वर्षांनंतर आपला आर्थिक स्तर आहे तो राखण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. ती करताना महागाईचा दर, आपल्या जबाबदाऱ्या, योजना, धोका पत्करण्याची क्षमता या सगळ्याचा विचार हवा. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक हा दीर्घकालीन फायदा देणारा आणि सुरक्षित पर्याय आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारून अगदी कमी रकमेपासूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येऊ शकते. विद्यार्थिदशेपासूनच गुंतवणुकीची सवय पुढील काळात चांगले लाभ देऊ शकते,’ असे मत लक्ष्मी अय्यर यांनी व्यक्त केले. केवळ कर वाचवणे नव्हे, तर चांगला परतावा मिळवणे हा गुंतवणुकीचा उद्देश असावा, असे सांगून कुलकर्णी म्हणाले, ‘आपण हिशेब लिहितो पण स्वत:च्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद मांडत नाही. काही वर्षांपूर्वी जी गुंतवणूक केली त्याचे आताचे मूल्य काय हे आपण लक्षात घेत नाही. असे मूल्यमापन करण्याची सवय लावून घेतल्यास कोणत्याही वित्तीय सल्लागाराशिवाय देखील तुम्ही आपल्या गुंतवणुकीची बाजारातील किंमत काय ते काढू शकाल. आपण आधी केलेली गुंतवणूक किती बरोबर होती किंवा ती कुठे चुकली हे यातून कळेल. वैयक्तिक गुंतवणुकीत पुढच्या पाच वर्षांसाठीचे धोरण हवे.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi man now turn to invest in stock market

ताज्या बातम्या