डॉ. अरुणा ढेरे  (प्रसिद्ध कवयित्री-लेखिका)

माझ्या वाचनप्रवासात स्त्रियांविषयीचे वाचन भरपूर झाले. तर हिंदीमध्ये पुरुषोत्तम आगरवाल, हजारी प्रसाद, विजयनिवास मिश्र यांचे साहित्यदेखील मी वाचले. पाठय़पुस्तकासोबत अवांतर वाचनामुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडली. शेक्सपीअरच्या कविता वाचताना शब्दांच्या अर्थाच्या छटा जाणून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. दया पवार, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर यांसारख्या अनेकांची पुस्तके माझ्या विशेष आवडीची. वाचनाचा प्रवास एका दिशेने व्हावा, असे कधीच वाटले नाही. त्यामुळे त्याच काळात प्राचीन मराठी साहित्याचे सौंदर्य जाणून घेण्याकरिता वाचन सुरू झाले.

माती, दगडं, विटा वापरून उभ्या केलेल्या भिंतींनी आपल्या घराला आकार येतो. परंतु आमचे घर काहीसे वेगळे होते. घरामध्ये जशा विटा वापरून उभ्या केलेल्या भिंती होत्या, किंबहुना तशाच अगदी घराच्या छतापर्यंत पोहोचतील एवढय़ा पुस्तकांच्या भिंती होत्या. माझे वडील रा. चिं. ढेरे (अण्णा) यांनी एकत्रित केलेला हा पुस्तकांचा संग्रह आजही आमच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेमाच्या घट्ट नात्यामध्ये बांधलेला आहे. प्रत्येक पुस्तकाचा वास काहीसा वेगळा असतो. मिळेल ते पुस्तक हातात घ्यायचे आणि आवडीने वाचायचे, असे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी शक्ती मिळते, ती वाचनातून. त्यामुळे वेगवेगळय़ा पुस्तकांतून विचारांचे धन गोळा करायचे आणि संगणकासमोर बसून कीबोर्डवर टायिपग करण्यापेक्षा वही-पेन हातात घेऊन आपले विचार त्यावर मांडायचे, ही माझी आवड आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली.

आमच्या वाडय़ामध्ये शेवटच्या मजल्यावर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे घर होते. त्यांचे घरही असेच, पुस्तकांनी भरलेले. चहूकडे जिथे नजर जाईल, तिथे पुस्तके दिसायची. त्यांच्या घरी आम्ही कधी गेलो, तर माळय़ावर पुस्तके ठेवलेल्या ठिकाणी जात असू. माळय़ात तसा प्रकाश जेमतेमच होता. त्यामुळे खिडकीतून येणाऱ्या उजेडाच्या झोतात हातात पुस्तक घ्यायचे आणि वाचायचे, असा दुर्मिळ अनुभवदेखील मी घेतला. एकीकडे आमच्या वाडय़ातील वाचनप्रेमी मंडळी आणि दुसरीकडे घरामध्ये असलेले अण्णांचे पुस्तकांचे साम्राज्य, यामुळे आम्ही भावंडं पुस्तकांच्या विश्वात रमू लागलो. जुन्या पुस्तकांना घरीच बाइंड करून अण्णा त्यांना देखणेपणाने हाताळण्यास योग्य असे बनवत. त्यामुळे बाइंड केल्यानंतर किंवा हाताने पुस्तक शिवल्यानंतर येणारा जुन्या-नव्या पुस्तकांचा वास आजही मला तितकाच आवडतो. अण्णांचा संग्रह आणि मला लहानपणी लागलेली वाचनाची आवड, यामुळे जिवंत माणसांसारखे पुस्तकांचे अस्तित्व आमच्या घरात वाढत होते.   अण्णांचा संग्रह पाहून मलाही असे वाटत होते, की माझा पुस्तकांचा संग्रह असावा. त्यामुळे माझी वैयक्तिक संपत्ती म्हणून पुस्तकांचा संग्रह करायला मला एका कपाटातील दोन कप्पे मिळाले. ते माझे कप्पे असल्याने सुरुवातीला भा. रा. भागवत, ना. धों. ताम्हनकर या लेखकांसह फास्टर फेणे, परीकथा अशी पुस्तके हळूहळू संग्रहित होण्यास सुरुवात झाली. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान इंदिरा संत, कुसुमाग्रज यांच्या पुस्तकांचे वाचन अगदी कधीही, कुठेही होत असे. माझे वाचनप्रेम जपले गेले, ते घरातील इतर सदस्यांमुळे. घरामध्ये मुलीने घरकाम करावे, अशी काहीशी धारणा असे. परंतु घरकामासोबतच मी वाचनही अग्रक्रमाने करावे, यासाठी घरातील इतरांनी मला साथ दिली. त्यामुळेच माझे वाचनाचे वेड जपले गेले.

लक्ष्मी रस्त्यावरील हुजूरपागा शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांचादेखील मला वाचनाच्या जवळ नेण्यात मोठा वाटा होता. शाळेत दांडेकर बाई या आमच्या शिक्षिका होत्या. त्यांनी खंडकाव्याचे वाचन घेतले. त्या वेळी कुतूहलापोटी मी गिरीश यांची माहिती ग्रंथालयातून घेतली आणि त्यांना वाचून दाखवली. त्या वेळी मिळालेले पाच रुपयांचे माझे आयुष्यातील पहिले बक्षीस, मला वाचनाप्रति प्रोत्साहन देणारे ठरले. पाठय़पुस्तकासोबत अवांतर वाचनामुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडली. शेक्सपीअरच्या कविता वाचताना शब्दांच्या अर्थाच्या छटा जाणून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. मूळ अर्थापासून दूर न जाता भाषांतर करणे, हे महत्त्वाचे असते. त्या वेळी इंग्रजी कादंबऱ्यांची माहिती देणाऱ्या शाळेतील वझे बाईंमुळे मला चांगल्या इंग्रजी साहित्याची ओळख झाली. हरिभाऊ आपटे यांच्यासारख्या दिग्गजांचे साहित्य वाचले आणि त्यासोबतच या वयात झालेल्या वाचन संस्कारांमुळे वैश्विक साहित्याची ओळख मला झाली.

वाढदिवसाला खाऊ म्हणून पुस्तके मिळायची. त्या वेळी कवी ग्रेस यांचा मिळालेला कवितासंग्रह आजही माझ्या बुकशेल्फमध्ये आहे. दया पवार, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर यांसारख्या अनेकांची पुस्तके माझ्या विशेष आवडीची. वाचनाचा प्रवास एका दिशेने व्हावा, असे कधीच वाटले नाही. त्यामुळे त्याच काळात प्राचीन मराठी साहित्याचे सौंदर्य जाणून घेण्याकरिता वाचन सुरू झाले. वाचनप्रवास अनेक दिशांनी धावत असला, तरी १९व्या शतकाविषयी सखोल आणि झपाटल्यासारखे वाचन झाले. याविषयीची नियतकालिके, संस्थांचे अहवाल आणि चरित्रेसुद्धा वाचून काढली. तर त्या काळातील पत्रव्यवहारदेखील शोधून वाचला. नारायण धारप, आगाथा ख्रिस्ती यांची पुस्तके मी प्रवासादरम्यान आवर्जून वाचते. चांगले अनुवाद आणि हलकेफुलके वाचन म्हणून पाडस, माझी सखी, चौघीजणी, गवती समुद्र अशी पुस्तके माझ्या संग्रहात आहेत.

माझ्या वाचनप्रवासात स्त्रियांविषयीचे वाचन भरपूर झाले. तर हिंदीमध्ये पुरुषोत्तम आगरवाल, हजारी प्रसाद, विजयनिवास मिश्र यांचे साहित्यदेखील मी वाचले. नू.म.वि.शाळेच्या बाहेर अप्पा बळवंत चौकात गाजरे यांचे जुन्या पुस्तकांचे दुकान होते. ते आमचे दुसरे घर असल्यासारखेच. अनेकदा अण्णा मला त्यांच्यासोबत तेथे नेत असत. याशिवाय भांडारकर इन्स्टिटय़ूट, इंटरनॅशनल बुक हाऊस अशी आमची आवडती ठिकाणे होती. पुस्तके घेण्याकरिता अण्णांनी आणि मीही पशांचा कधीच विचार केला नाही. दक्षिण भारतात गेले असताना द्रौपदीविषयी अधिक जाणून घेण्यास भरपूर पुस्तकांची खरेदी केली होती. माझ्या आयुष्यातील बाहेरगावी असलेला कोणताही प्रवास पुस्तकांच्या खरेदीशिवाय पूर्ण झाला नाही. संदर्भ ग्रंथ मिळविण्याकरिता अनेक पुस्तक दुकानदारांशी बोलणे होत असे. त्यामुळे त्यांच्याशी वाचन आणि पुस्तकांविषयी सुसंवाद घडत असे.

आमच्या घरामध्ये असलेला अण्णांचा पुस्तकसंग्रह हीच माझ्यासाठी खरी संपत्ती. तो संग्रह अण्णांचा असल्याने त्याविषयी त्यांना जास्त माहिती होती. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने हा संग्रह ठेवलेला आहे. त्यातील पुस्तके पाहून विषयांनुसार किंवा ग्रंथप्रकारांनुसार त्याचे वर्गीकरण करावे, यासाठी मी पुस्तके पाहून त्याच्या कच्च्या नोंदी करीत आहे. केवळ वाचन म्हणून अण्णांनी हा संग्रह केला नव्हता. तर त्यामध्ये विषय आणि संशोधन प्रकल्पांनुसार संदर्भ म्हणून पुस्तकांचे वर्गीकरण आहे. त्यामुळे आता इतरांच्या दृष्टीने ते उपयोगी पडावे, याकरिता नियोजन सुरू आहे. जसे चांगला लेखक होण्यासाठी वाचन आवश्यक असते. तसेच चांगला माणूस होण्यासाठी वाचन गरजेचे आहे. वाचनाने आपण केवळ स्वत:चे नाही, तर इतरांचेही आयुष्य जगत असतो. त्यामुळे माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रत्येकाने वाचनशक्ती वाढवायला हवी.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी