scorecardresearch

आपल्यातून एक आनंदयात्री हरपला

तेथील महाराष्ट्र मंडळामध्ये मी पाडगावकरांची मुलाखत घेतली होती.

मान्यवरांची श्रद्धांजली
लंडन येथील शेक्सपिअरच्या गावामध्ये शेक्सपिअर स्मारकाला पाडगावकर यांच्यासमवेत भेट देण्याचे भाग्य मला लाभले होते, अशी आठवण वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सांगितली.
तेथील महाराष्ट्र मंडळामध्ये मी पाडगावकरांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मुकुंद नवाथे हे आम्हाला शेक्सपिअरच्या गावात घेऊन गेले. या स्मारकामध्ये शेक्सपिअरच्या नाटकांच्या संहितेबरोबरच पाडगावकर यांनी या नाटकांचा मराठी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रतीदेखील ठेवण्यात आल्या आहेत. असा बहुमान मराठी साहित्यिकाला क्वचितच मिळाला असेल. आम्ही घरामध्ये गेल्यानंतर स्मारकाच्या अधिकाऱ्याने नाटकातील इंग्रजी संवादाचे पान वाचले. तर, पाडगावकर यांनी त्या संवादाच्या मराठी अनुवादाचे वाचन केले. मग त्या अधिकाऱ्याने तळघरातील शेक्सपिअरची खोली दाखविली. तेथे असलेला पुस्तकांचा खजिना पाहून पाडगावकर आणि मी, आम्ही भारावून गेलो होतो. केवळ पाडगावकर बरोबर असल्याने मीदेखील या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार झालो. आपल्या कवितांमधून पाडगावकर यांनी मानवी जीवनमूल्याधिष्ठित उदात्त तत्त्वगर्भता, मानवतावाद आणि समाजवादाचा प्रचार आणि प्रसार केला. माणसाच्या माणूसपणाची प्रतिष्ठापना करून माणसाचा गौरव कसा वाढेल अशी विचारधारा त्यांनी लेखनातून जोपासली, अशी भावना ज्येष्ठ गजलकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केली. रसिकांच्या मनामनात ज्यांच्या कविता आणि गाणी रुंजी घालीत आहेत असे लोकप्रिय ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर एक आनंदाचं गाणं आपल्या हाती देऊन गेले, अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केली. तांबे यांच्या कवितेची गीतीपरंपरा, बोरकरांच्या कवितेतील सौंदर्य आणि नाद जपता जपता जीवनावर निरतिशय प्रेम करणारे मंगेश पाडगावकर हा आनंदयात्री आपली जीवनयात्रा संपवून गेला हे खरे नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2015 at 00:01 IST

संबंधित बातम्या