scorecardresearch

मार्चच्या तापमानाचा १२२ वर्षांतील उच्चांक; उन्हाच्या तीव्र चटक्यात पावसाचा मात्र नीचांक

मार्च महिन्यातील तापमान आणि हवामानाने यंदा विविध वैशिष्टय़े आणि विक्रम नोंदिवले आहेत.

पुणे : मार्च महिन्यातील तापमान आणि हवामानाने यंदा विविध वैशिष्टय़े आणि विक्रम नोंदिवले आहेत. या महिन्यांत महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्याहून अधिक भागांत दोन टप्प्यामध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटांनी गेल्या १२२ वर्षांतील कमाल तापमानाचा उच्चांक नोंदिवला आहे. संपूर्ण महिना उन्हाच्या तीव्र झळा कायम राहिल्याने या महिन्यात देशात अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहिले. सरासरीच्या तुलनेत मार्चमध्ये पाऊस ७१ टक्के कमी झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने नमूद केले आहे.

हिमाचल प्रदेशापासून पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मार्चमध्ये दोन टप्प्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उष्णतेच्या लाटा दीर्घकाळ कायम होत्या. पहिल्या टप्प्यात ११ ते १९ मार्च, तर दुसऱ्या टप्प्यात २७ ते ३१ मार्च या कालावधीत उष्णतेची लाट होती. ती एप्रिलच्या सुरुवातीलाही कायम असली, तरी संपूर्ण मार्च महिन्याचा विचार केल्यास या महिन्यात गेल्या १२२ वर्षांतील उच्चांकी कमाल तापमानाची सरासरी नोंद देशात झाली आहे. कमालच नव्हे, तर रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही चढा राहिल्याने त्याचाही उच्चांक झाला आहे.

प्रामुख्याने उत्तर-पश्चिम भारतात कमाल तापमान सर्वाधिक राहिले. संपूर्ण भारतातील कमाल तापमान मार्चमध्ये सरासरीच्या तुलनेत १.८६ अंशांनी अधिक होते. उष्णतेच्या दोन लाटांच्या टप्प्यामध्ये मधल्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाची निर्मिती झाली. याच काळात काही भागात पाऊस झाला. मात्र उन्हाच्या तीव्र झळांनी यंदाच्या मार्चमध्ये ७१ टक्के कमी पाऊस झाला. मार्चमध्ये देशात सरासरी ३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र तो यंदा ८.९ मिलिमीटर झाला. १९०१ पासून हा पाऊस तिसरा नीचांकी पाऊस ठरला. यापूर्वी सन १९०१ च्या मार्चमध्ये ७.२, तर १९०८ मधील मार्चमध्ये ८.७ मिलिमीटर नीचांकी पावसाची नोंद देशात झाली होती.

मार्च २०१० मधील विक्रम मोडीत

देशामध्ये १९०१ पासूनच्या कमाल आणि किमान तापमानाची सरासरी काढण्यात आली आहे. मार्चमध्ये दिवसाचे कमाल तापमानाची सरासरी ३१.१४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानाची सरासरी १८.८७ अंश आहे. मात्र, यंदाच्या मार्चमध्ये कमाल तापमान ३३.१०, तर किमान तापमान २०.२४ अंश नोंदिवले गेले. १२२ वर्षांमध्ये २०१० मध्ये आजवरच्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. या वर्षांतील मार्चमध्ये ३३.०९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. रात्रीचे किमान तापमानही गेल्या १२२ वर्षांतील तिसरे उच्चांकी तापमान ठरले आहे.

राज्यातील अंदाज उत्तर-पश्चिम भारतामध्ये सध्या उष्णतेची लाट कायम असल्याने महाराष्ट्रातील तापमानवाढ कायम आहे. विदर्भात अद्यापही सर्वच भागांत कमाल तापमान ४० अंशांपार आहे. शनिवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातही सर्वत्र ४० अंशांपुढे कमाल तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आदी भागांत ४० ते ४३ अंशांवर कमाल तापमान असून, उष्णाचा चटका तीव्र आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील तापमान सरासरीपुढे आहे. दोन दिवस तापमानवाढ कायम राहणार असून, त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, ५, ६ एप्रिलला कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागांत, तर ६ एप्रिलला विदर्भात तुरळक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: March temperatures hit highs low rainfall intense heat ysh

ताज्या बातम्या