लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेकडून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
विधानभवनापासून मोर्चा प्रारंभ करण्यात आला. पोलीस आयुक्तयालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या पदाधिकारी ॲड. पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रशासन आणि शासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निर्भया प्रकरणानंतर वर्मा आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही. पीडितेला निर्भया फंडातून आर्थिक मदत केली जात नाही. राजस्थानातील विशाखा समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही. पुणे शहरात महिला, युवतींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिला संघटनेच्या मागण्या
अल्पवयीनांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) दाखल होणारे गुन्हे महिला न्यायाधीशांनी नोंदवून घ्यावेत. पीडित महिला, युवतींची तक्रार पोलिसांनी तिच्या घरी जाऊन नोंदवून घ्यावी. अत्याचार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. खासदार, आमदार, मंत्र्यांनी दिलेले पोलीस संरक्षण कमी करावे. प्रत्येक पोलीस ठाण्यासह चैाकीत स्वतंत्र महिला कक्ष करावेत. पोलीस भरतीत महिलांसाठी जास्तीत जास्त आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.