झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये

पावसामुळे झेंडूसह सर्व फुलांची आवक कमी

पावसामुळे झेंडूसह सर्व फुलांची आवक कमी

पुणे : पुणे  जिल्ह्य़ासह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांची आवक कमी झाली. आवक कमी  तसेच मागणी वाढल्याने  झेंडूसह सर्वच फुलांना मोठी मागणी राहिली. बाजारात प्रतवारीनुसार एक किलो झेंडूला २०० ते ३०० रुपये असा भाव मिळाला. एक किलो शेवंतीला १५० ते ३०० रुपये तसेच गुलछडीला २३० ते ६०० रुपये असा भाव मिळाला.

टाळेबंदीत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड बंद होता. र्निबध शिथिल झाल्यानंतर चार महिन्यानंतर फूल बाजाराचे कामकाज नियमित झाले. मंदिरे बंद असल्याने फुलांना विशेष मागणी नव्हती. गणेशोत्सवात झेंडूला मागणी राहणार असल्याची शक्यता गृहित धरून शेतकऱ्यांनी झेंडूची तोड केली होती. मात्र, गेल्या आठवडय़ापासून पुणे जिल्ह्य़ासह सातारा, सोलापूर, बीड भागात पाऊस सुरू झाला. झेंडूची तोड न झाल्याने शेतात झेंडू भिजला. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर झेंडूच्या मागणीत वाढ झाली. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने चांगल्या प्रतीच्या एक किलो झेंडूला २०० ते ३०० रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती फूल बाजारातील प्रमुख व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

शुक्रवारी  (२१ ऑगस्ट) फूल बाजारात २७ हजार किलो झेंडूची आवक झाली. पांढऱ्या शेवंतीची साडेबारा हजार किलो अशी आवक झाली. शनिवारी (२२ ऑगस्ट) झेंडूची आवक कमी झाली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. फुलांचे एक किलोचे भाव पुढीलप्रमाणे- झेंडू २०० ते ३०० रुपये, शेवंती- १५० ते ३०० रुपये, गुलछडी- २३० ते ६०० रुपये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marigold flower prices shoot up as ganeshotsav begins zws

ताज्या बातम्या