पुणे : मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांनी धूळवड साजरी केली. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी खवय्यांची सकाळपासून बाजारात गर्दी झाली होती. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत आखला जातो. दुसऱ्या दिवशी धुळवडीला अनेक जण घरोघरी सामिष पदार्थ तयार करतात. नातेवाईक, मित्रमंडळीना निमंत्रणे दिली जातात.

शुक्रवारी सकाळपासूनच मटण, मासळी बाजारात खरेदीसाठी खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. मटणाला हाॅटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी होती,असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती पुणे, पिंपरी-चिंचवड बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

गणेश पेठेतील मासळी बाजार, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कसबा पेठ, पौड रस्ता, पद्मावती, विश्रांतवाडीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

मासळी तेजीत

गणेश पेठेतील मासळी बाजारात शुक्रवारी खोल समुद्रातील मासळी १२ ते १५ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन या मासळीची एकूण मिळून १५ ते २० टन, नदीतील मासळी ७०० ते ८०० किलो, तसेच खाडीतील मासळीची ४०० ते ५०० किलो अशी आवक झाली. पापलेट, रावस, हलवा, सुरमई, ओले बोंबिल, कोळंबी या मासळीचे दर तेजीत असल्याची माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मटण,  मासळी, चिकनचे किलोचे दर

मटण – ७८० रुपये

चिकन – २२० रुपये

पापलेट- १००० ते १८०० रुपये

हलवा – ६५० ते ८०० रुपये

रावस – ७०० ते ९००

सुरमई – ५०० ते ८०० रुपये

कोळंबी – २४० ते ७०० रुपये ओले बोंबिल – ३०० रुपये