पुणे : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाले. आवक कमी झाल्याने टोमॅटो, मटार, गाजर, हिरवी,मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहिले.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश, राजस्थानातून मिळून ८ ते ९ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ४५० ते ५०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा २ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून १०० ते ११० टेम्पो अशी आवक झाली. तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो अशी आवक झाली.
पुदीना, पालक, चाकवत, अंबाडीच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुदीना, पालक, चाकवत, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. राजगिऱ्याच्या दरात घट झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या एक लाख १० हजार जुडाी, मेथीच्या ६० हजार, तसेच ५ ते ६ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – ७०० ते ८००, शेपू – ८०० ते १०००, कांदापात – १००० ते १५००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १००० ते १५००, राजगिरा – ४०० ते ६००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ६००, पालक – १००० ते २०००, हरभरा गड्डी – ८०० ते १०००.
कलिंगड, खरबूज, पपई, बोरांच्या दरात वाढ
घाऊक बाजारात कलिंगड, खरबूज, बोरे पपईच्या दरात वाढ झाली. महाशिवरात्रीमुळे फळांच्या मागणीत वाढ झाली. अननस, चिकू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, पेरु या फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील फळ बाजारात मोसंबी ५० ते ६० टन, संत्री ३० ते ४० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे १२०० ते १५०० गोणी, चिकू २ हजार गोणी, खरबूज २० ते २५ टेम्पो, कलिंगड १५ ते १६ टेम्पो, पेरू १०० ते १५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), केरळहून अननस ६ ट्रक, बोरे १२५ ते १५० गोणी अशी आवक झाली.

