पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, मटार, पावटा, शेवगा, गवार, भेंडी फळभाज्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, इंदूरमधून ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, गुजरात, कर्नाटकातून प्रत्येकी २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेशातून २ टेम्पो मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ५०० ते ६०० गोणी सातारी आले, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, घेवडा ३ ते ४ टेम्पाे, पावटा २ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, कांदा १२५ टेम्पो, तसेच पारनेरहून १२५ ते १५० गोणी मटार अशी आवक झाली. तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो अशी आवक झाली.

पालेभाज्यांचे दर स्थिर

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबीर ९० हजार जुडी, तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – १२०० ते १५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ८००, करडई- ५०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ५०० ते ८००, चुका- ८०० ते १०००, चवळई – ५०० ते ७००, पालक -८०० ते १५००

कलिंगड, लिंबू, खरबूजच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंब या फळांच्या दरात वाढ झाली. चिकू, अननस, मोसंबी, संत्र्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री १ ते २ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे ६०० ते १००० गोणी, कलिंगड १५ ते २० टन, खरबूज १० ते १५ टन, चिकू दोन हजार गोणी, पेरू १०० ते १२५ प्लास्टिक जाळी, (क्रेट्स), अननस ६ ट्रक अशी आवक झाली.