पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांच्या अंतर्गत राजकारणामुळे मार्केटयार्डातील तोलणारांची आर्थिक कोंडी झाली आहे. जून महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने येत्या सोमवारपासून (२६ ऑगस्ट)काम बंद ठेवण्याचा निर्णय तोलणार संघटनेने घेतला आहे. याबाबतचे पत्र संघटनेकडून बाजार समितीला पाठविण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत सभापतींचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव करण्यात आल्याने तोलणारांचे वेतन थकल्याची माहिती तोलणारांनी दिली.
मार्केटयार्डातील विविध विभागात काम करणाऱ्या तोलणारांचे वेतन विलंबाने होते. ऑगस्ट महिना संपत आला असली तरी, अद्याप जून महिन्याचे वेतन मिळाले नाही. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्यात आले. त्याानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे या निर्णयाला आव्हान दिले आहे. अद्याप सुनावणी झाली नसल्याने निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे वेतनाच्या धनादेशावर स्वाक्षरी कोणी करायची? यावरून संचालक मंडळात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर तोलणारांना वेतन मिळणार नसल्याची माहिती तोलणारांनी दिली. हक्काच्या वेतनासाठी सोमवारपासून काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार संघटनेकडून बाजार समितीला देण्यात आले आहे.
हेही वाचा…सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या सदनिकेतून नऊ लाखांचा ऐवज चोरी, कामगार अटकेत
मार्केटयार्डातील भुसार, फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात मिळून ३७५ तोलणार आहेत. तोलणारांनी काम केल्यास आडते तसेच व्यापारी शेतकऱ्यांच्या पट्टीतून तोलाई कपात करतात. त्यानंतर तोलाई बाजार समितीकडे जमा केली जाते. महिन्याची तोलाई जमा झाल्यानंतर बाजार समितीकडून तोलाईची रक्कम माथाडी मंडळाकडे वर्ग केली जाते. माथाडी मंडळाकडून तोलणारांचे वेतन दिले जाते. सभापतींचे स्वाक्षरीचे अधिकार काढल्यााने बाजार समिती संचालकांत गोंधळ निर्माण झाला आहे. बाजार समितीकडे अडते, तसेच व्यापाऱ्यांनी जून महिन्यातील तोलाई जमा केली आहे. मात्र, तोलाई माथाडी मंडळाकडे कोणाच्या स्वाक्षरीने द्यायची?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाजार समितीतील राजकारणामुळे तोलणारांचे वेतन थकले आहे.
मार्केटयार्डातील तोलणारांना एक महिना विलंबाने वेतन मिळते. जूनचे वेतन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप वेतन मिळाले नाही. बाजार समितीचे सचिव आणि सभापतीची भेट तोलणार घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमचे शिष्टमंडळ पुढील निर्णय जाहीर करणार आहे. – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, तोलणार संघटना, मार्केटयार्ड.
हेही वाचा…शिक्षक भरतीची कार्यपद्धती बदलणार? शिक्षण विभागाचा निर्णय काय?
बाजार समितीतील गोंधळाचा फटका
बाजार समितीतील गोधळामुळे तोलणारांना वेतन मिळाले नाही. वेतन न मिळाल्याने तोलणार आणि त्यांच्या कुटुंबीयांना झळ सोसावी लागत आहे. वेतनासाठी बुधवारी विविध विभागातील कामकाज दोन तास काम बंद ठेवण्यात आले होते. दोन दिवसांत वेतन न मिळाल्यास येत्या सोमवारपासून काम बंद ठेवण्यात येणार आहे.– संतोष ताकवले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार संघटना