जीवनाच्या जोडीदाराची पुनर्विवाहातून भेट!

पुनर्विवाह हा योग्य पर्याय ठरू शकतो, या जाणिवेतून भ्रातृमंडळ ही संस्था गेल्या दशकभरापासून कार्यरत आहे.

तरुणपणातच अचानक येणारा दुर्दैवी मृत्यू आणि सूर न जुळल्यामुळे होणारे घटस्फोट अशा कारणांमुळे अनेक कुटुंबं विस्कळीत होत आहेत. अध्र्यावरती डाव मोडल्यानंतर उर्वरित आयुष्य एकाकी व्यतीत करण्यापेक्षाही पुनर्विवाह हा योग्य पर्याय ठरू शकतो, या जाणिवेतून भ्रातृमंडळ ही संस्था गेल्या दशकभरापासून कार्यरत आहे. अशा विवाहातून अनेकांची जीवनाच्या जोडीदाराची भेट झाली असून त्यांचे संसार नव्याने फुलले आहेत.
जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती न झाल्यामुळे घटस्फोट होत आहेत. त्यामुळे समाजामध्ये घटस्फोटितांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अपघातामध्ये अचानक आलेले मरण आणि अवचितपणे येणारा नैसर्गिक मृत्यू यामुळे लहान वयामध्येच मुलगी विधवा होते. तर, काहीवेळा पुरुषदेखील विधुर होतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे व्यथित असलेल्या व्यक्तींच्या दु:खावर अलगदपणे फुंकर घातली जावी, त्यांच्या आयुष्यामध्ये सहजीवन परत एकदा फुलून यावे आणि त्यांच्या अस्थिर जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त व्हावे या उद्देशातून भ्रातृमंडळ कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षांत किमान शंभरहून अधिक घटस्फोटित, विधवा आणि विधुर पुन्हा एकदा विवाहबंधनामध्ये अडकून सुखाने जीवन व्यतीत करीत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी दिली. डॉ. खर्चे हे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.
दहा वर्षांपासून भ्रातृमंडळ पुनर्विवाहेच्छुंचा मेळावा घेत आहे. आतापर्यंत या मेळाव्याच्या माध्यमातून किमान शंभरहून अधिक विवाह जुळले असून त्यांचे सहजीवन आनंदामध्ये सुरू आहे, असे डॉ. राम खर्चे यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये विवाह जुळला आणि त्यानंतर सूर जुळले नाहीत म्हणून घटस्फोट घेतला असे एकही उदाहरण अद्याप घडलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकदा डाव मोडला असला तरी विवाहसंस्था आणि सहजीवन यावरचा विश्वास अजूनही ढळलेला नाही याचेच ते द्योतक आहे, असे म्हणता येते. या मेळाव्यामध्ये परिचय झालेले वधू-वर एकमेकांच्या संपर्कात राहतात आणि नंतर विवाह जुळल्यानंतर आम्हाला सांगितले जाते, एवढेच नव्हे तर मी स्वत: अशा काही विवाहांना उपस्थित राहिलो आहे. विवाह झाल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर, मंडळातर्फे त्यांना मार्गदर्शनही केले जाते, असेही खर्चे यांनी सांगितले.

मुलांमध्ये न्यूनगंड
समाजामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची लोकसंख्या कमी आहे. मात्र, भ्रातृमंडळाच्या पुनर्विवाह वधू-वर मेळाव्यासाठी नावनोंदणी केली जाते तेव्हा मुलींची नोंदणी संख्या अधिक असते. यंदाच्या मेळाव्यासाठी ७३ वधू आणि ६० वर अशा १३३ जणांनी नावनोंदणी केली होती. आपल्याविषयीची माहिती उघड होईल हा न्यूनगंड असल्यामुळे मुले नावनोंदणी करण्यासाठी फारशी उत्सुक नसतात, याकडेही डॉ. राम खर्चे यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marriage beuro successfully arrange more than hundred wedding

ताज्या बातम्या