पुणे : मुलाला भेटण्यासंदर्भात कौटुंबिक न्यायालयाने घातलेली अट धुडकावून शाळेत जाऊन मुलाची माहिती घेणे, तसेच मुलाला आईपासून घेऊन जाण्याच्या धमक्या देऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून पती, सासू , सासरे सुरेश कोठारी आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाने पतीला पुढील दोन महिने मुलाला भेटण्यास मनाई केली होती. मुलाला केवळ न्यायालयाच्या आवारातच भेटण्याची परवानगी असताना संबंधित पित्याने कोंढव्यातील शाळा व्यवस्थापनाकडून मुलासंदर्भातील माहिती घेतली. तसेच, वारंवार दूरध्वनी आणि एसएमएस करून मुलाला आईपासून घेऊन जाण्याच्या धमक्या देत होते.

अनोळखी मोबाइल क्रमांकांवरूनही फिर्यादीच्या नातेवाइकांना तसेच त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून त्रास दिला जात होता. या प्रकारामुळे महिला आणि तिचा मुलगा दहशतीखाली असून, मुलगा शाळेत किंवा घराबाहेर जातानाही घाबरत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.