मंगळ हा पृथ्वीचा सहोदर असलेला ग्रह येत्या २७ ऑगस्टला चंद्राप्रमाणे मोठा दिसणार असल्याची अफवा यंदाही इमेलवरून पसरवण्यात आली असून तो नेहमीच्याच आकारात दिसणार आहे, असे मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. या वेळी मंगळ पृथ्वीच्या सर्वात निकट येत असून त्यामुळे तो मोठा दिसणार असल्याचा दावा इमेलमध्ये करण्यात आला असला, तरी तो मोठा दिसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले, मंगळ चंद्राएवढा दिसणार असल्याची अफवा दरवर्षीच उठवली जाते. या वेळीही मंगळ नुसत्या डोळ्यांनी चंद्राएवढा वाटोळा दिसणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
परांजपे यांनी सांगितले, की या दोन ग्रहातील सर्वात कमी अंतर (५५.७६ दशलक्ष कि.मी.) हे २७ ऑगस्ट २००३ रोजी दुपारी ३.२१ वाजता होते. पण त्या वेळीही मंगळ चंद्राएवढा दिसेल अशी अफवा इमेलद्वारे उठवण्यात आली होती, त्या वेळी साठ हजार वर्षांनंतर पृथ्वी व मंगळ यांच्यातील अंतर खूप कमी होते. आता यापुढे ते इ.स. २२८७ मध्ये कमीत कमी अंतरावर असतील. यापूर्वी  या दोन ग्रहातील सर्वात कमी अंतर इ.स.पूर्व ५५५३७ मध्ये होते.
आताही अनेकांना मंगळ चंद्राएवढा मोठा असल्याचे इमेल आले असून वस्तुस्थिती तशी नाही. गेल्या दहा वर्षांत ही अफवा पसरवणाऱ्या इमेलची अनेक रूपे पाहायला मिळाली अगदी ग्राफिक्स व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने ही अफवा गळी उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात काही तथ्य नाही, असे परांजपे यांनी सांगितले.
ते म्हणाले, की पृथ्वीची कक्षा मंगळाच्या आत आहे व ती दर २६ महिन्यांनी म्हणजे २ वष्रे २ महिन्यांनी मंगळाच्या कक्षेला ओलांडून जाते. त्यामुळे मंगळ व पृथ्वी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जास्त जवळ येतात. दोन्ही ग्रहांच्या कक्षा या लंबवर्तुळाकार असून त्या वर्तुळाकृती नाहीत. त्यामुळे दोन्ही ग्रहातील जवळचे अंतर नेहमी बदलत जाते, ते ५४.६ दशलक्ष किलोमीटर ते ४०१ दशलक्ष किलोमीटर या दरम्यान असते.
मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ आला, तरी तो सहा किलोमीटरवरून क्रिकेटचा चेंडू जेवढा दिसतो तेवढय़ाच आकाराचा दिसेल. यापुढे मंगळ व पृथ्वी यांच्यातील जवळचे अंतर १४ एप्रिल २०१४ रोजी असणार आहे. त्या दिवशी मंगळ आपल्यापासून ९२ दशलक्ष किलोमीटर दूर असणार आहे. जेव्हा एखादे अंतराळयान मंगळावर सोडायचे असते, तेव्हा ते मंगळ व पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असताना सोडले जाते असेही त्यांनी सांगितले.