इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (इन्सा) या संस्थेने २०१४ चा रसायन विज्ञानातील सवरेत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार पुणे विद्यापीठातील मानद प्राध्यापक डॉ. मर्झबान मोराबजी वाडिया यांना जाहीर केला खरा; पण मागील ४७ वर्षे डॉ. वाडिया यांचा प्रत्येक विद्यार्थी हा पुरस्कार त्यांना मनोमन प्रदान करतच आला आहे. ‘इन्सा’ने आता त्यावर आपली मोहोर उमटवली आहे एवढेच.
आपल्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. वाडिया हे केवळ शिक्षक कधीच नव्हते. ते तत्त्वज्ञ, मित्र आणि मार्गदर्शकही आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी शिकवलेल्या रसायन विज्ञानाबरोबरच शिक्षकाची कर्तव्ये, विद्योपासनेवरील निष्ठा, विद्यार्थिहित, दक्षता हीपण मूल्ये कायमची कोरली जातात.
डॉ. वाडिया यांनी पुणे विद्यापीठात रसायनशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली, त्या वर्षीच्या पहिल्या गटाचा १९६७ सालचा मी विद्यार्थी. यथावकाश मी त्यांचा सहकारी, सहसंशोधक आणि नंतर वाडिया परिवाराचा मित्र झालो. म्हणूनच सवरेत्कृष्ट शिक्षकाचे कोणकोणते पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेले आहेत, हे मी फार जवळून अनुभवले आहे.
आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उच्च ध्येये निश्चित करणे, हे चांगल्या गुरूचे व्यवच्छेदक लक्षण असते. शिरस्त्याप्रमाणे डॉ. वाडिया यांच्या वर्गात हुशार, सुमार, प्रोत्साहित, कंटाळलेले, स्वारस्य नसलेले, झोपा काढणारेही विद्यार्थी होतेच. पण शिक्षक म्हणून ते संपूर्ण वर्गाचा कल अजमावत, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीनुसार, वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान प्रदान करीत.  झोपणाऱ्याला जागे करून मुख्य प्रवाहात आणत. आपली टिपणे, नवनवीन माहितीची प्रत विद्यार्थ्यांना वाटत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी शिकल्याशिवाय राहूच शकत नसे.
वैचारिक शिस्त, सुस्पष्ट उद्दिष्टे आणि नेटके काम हे गुण चांगल्या शिक्षकात असतातच असतात. डॉ. वाडियासुद्धा शिकवण्याचे काम विलक्षण शिस्तबद्ध पद्धतीने आणि नेटकेपणाने करत. मात्र ही शिस्त व नेटकेपणा त्यांच्या टेबलावर मात्र कधीही दिसली नाही. ती त्यांच्या दिनक्रमातही प्रतिबिंबीत झाली नाही. याचे कारण शिक्षक म्हणून त्यांचा दिनक्रम केवळ रसायन विज्ञानाशीच निगडित होता.
निवृत्त न होता गेली अनेक वर्षे ते वर्षांला ३०० तासिका शिकवण्याचे महाप्रचंड काम करत असतात.
डॉ. वाडिया निव्वळ संशोधक कधीच झाले नाहीत. संशोधन करतानाही त्यांनी विद्यादानाचे मूलतत्त्व कायम ठेवले. म्हणूनच त्यांनी तयार केलेले संशोधन-विद्यार्थीपण वेगवेगळ्या, कमी-जास्त क्षमतांचे असत. उत्तम विद्यार्थ्यांला वेचून, त्याच्याकडून दर्जेदार संशोधन करून घेणे सोपे पण असते आणि सोयिस्कर पण. डॉ. वाडियांनी मात्र कोणत्याही क्षमतांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधून संशोधक तयार केले. त्यांच्या प्रयोगशाळेतील वातावरण भयमुक्त, कामास अनुकूल, उत्साहवर्धक असे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे डॉ. वाडिया हे श्रद्धास्थान असते.
चांगला शिक्षक हा स्वत: उत्तम विद्यार्थी असावा लागतो, नव्हे तो असतोच. डॉ. वाडियांची कुणाहीकडून, कधीही, काहीही शिकण्याची तितिक्षा अजूनही टिकून आहे. आणखी एक त्याहून महत्त्वाचा गुण म्हणजे आपण जे शिकलो ते दुसऱ्याला रुचेल आणि पचेल अशा रूपात सादर करण्याची त्यांच्यामध्ये हातोटी आहे. म्हणूनच आजही ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसंगी गैरसोय सहन करून, एस.टी. बसने प्रवास करून, कुणीही बोलावले तरी व्याख्यान देण्यास जातात. आपल्यासाठी गाडी पाठवावी, चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करावी अशी त्यांची अपेक्षा नसते. जे द्याल ते, जसे असेल तसे स्वीकारत ते निवृत्तीनंतरही शिकवण्याचे काम करत राहतात. ते ज्या आडगावात जातात, तेथील लोकांना कल्पनाही नसते की एक ऋषितुल्य गुरू त्यांच्या दारी विद्यादान करायला आला आहे.
त्यांचे विद्यार्थी आणि सहकारी यांनी मिळून डॉ. वाडिया यांच्या नावाने एक विश्वस्त निधी सुरू केला आहे. महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक वाखाणण्याजोगे संशोधनाचे काम करतात, त्या शिक्षकांना या ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात येते. पुणे विद्यापीठातील रसायन विज्ञान विभागातील एका व्याख्यान कक्षास डॉ. वाडिया यांचे नाव देण्यात आले आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयातील एक कप्पा डॉ. वाडियांसाठी राखून ठेवलेला असतो.