पुणे : ‘गणसंख्या पूर्तीअभावी मंगळवारी घेण्यात आलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक बेकायदेशीर आहे,’ असा आरोप परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी बुधवारी केला. बहुसंख्य सदस्यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव दाखल करून सभात्याग केल्यावर, सदर कार्यकारिणीची बैठक बरखास्त करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक होते. तसे न करता उर्वरित सदस्यांच्या उपस्थितीत घेतलेली सभा घटनाबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला.

परिषदेची मंगळवारी झालेली कार्यकारिणीची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव दाखल केल्याने गाजली. अविश्वास ठराव दाखल करून सभात्याग केल्यावर कार्यकारिणीची बैठक बरखास्त करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक होते. शिल्लक राहिलेल्या अल्पमतातील सदस्यांना, उक्तसभा तहकूब केल्याचे दाखवत, नंतर अर्ध्या तासानंतर सभेचे काम मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत उरकले. वास्तविक पाहता घटनेच्या कलम १७ (४) नुसार ‘कार्यकारी मंडळाच्या सभेसाठी १५ सदस्यांची गणसंख्या आवश्यक राहील’ तरतूद आहे. त्यानुसार सभेच्या सुरुवातीला २७ सदस्य उपस्थित असल्याने, गणसंख्या पूर्ती झाली होती आणि त्यामुळेच सभेचे काम सुरू करण्यात आले. बहुसंख्य सदस्यांनी सभात्याग केल्यावर सभेचे अध्यक्ष आणि पिठासीन अधिकारी सभा सोडून सभागृहाच्या बाहेर पडले. इथेच सभा बरखास्त झाली आहे, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. त्यानंतर पश्चात बुद्धीने केवळ सात सदस्यांनी सभेचे कामकाज पूर्ण केल्याचा आभास निर्माण केला. त्यामुळे घटनेच्या कलम १७ (४) चा अवमान करण्यात आल्याचे सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला.

महाजन म्हणाले, ‘घटनेच्या कलम ११ (६)(३) नुसार कार्यकारी मंडळावर आवश्यकतेनुसार नियुक्त करण्याच्या दोन स्वीकृत सभासदांपैकी एक महाविद्यालयीन, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांपैकी एक असेल,’ अशी स्पष्ट तरतूद आहे. वास्तविक पाहता अशी अट पूर्ण करणाऱ्या किमान दोन सभासदांनी संस्थेकडे स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून, तसे रीतसर अर्ज देखील दाखल केले आहेत. त्यातील एक अर्ज अध्यक्षांनी कार्यकारी मंडळाच्या पहिल्याच बैठकीच्या पटलावर ठेवून, त्याचे वाचन केले होते.’

सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर अध्यक्ष योगेश सोमण आणि मी, आम्ही दोघे सुनील महाजन यांना भेटण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. महाजन दिसले नाहीत म्हणून सोमण यांनी त्यांना दूरध्वनी केला. मात्र, तरीही संवाद होऊ शकला नाही. प्रमुख कार्यवाह हे बैठकीचे पीठासन अधिकारी असतात. त्यांनी जागा सोडलेली नव्हती. त्यामुळे सभा बरखास्त झाली असा दावा करणे योग्य नाही. बैठक सुरू होण्यापूर्वी २७ सदस्यांच्या स्वाक्षरी असल्याने घटनेनुसार बैठकीची गणसंख्या पूर्ती झालेली होती. – प्रदीप निफाडकर, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद