पुणे : निवडणुकीनंतर सहा महिन्यांतच आधी उडणाऱ्या खटक्यांचे रूपांतर दिवाळीपूर्वीच फटाके फुटण्यात झाले आहे. कार्यकारिणी सदस्यांच्या उठावातून सत्ताबदलाचे वारे वाहू लागले की काय, असा प्रश्न शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जेमतेम तीन महिने उरले असताना उपस्थित झाला आहे. मात्र, ज्यांनी उठाव केला ते स्थानिक कार्यवाह बुधवारी बारामतीमध्ये होत असलेल्या नांदी संमेलनाची जबाबदारी पार पाडण्यामध्ये व्यग्र होते.

परिषदेतील सत्ताधारी परिवर्तन आघाडीचा पराभव करून साहित्य संवर्धन आघाडी १५ मार्च रोजी सत्तेत आली. एक एप्रिलपासून कारभार सुरू झाला असला, तरी सहा महिन्यांत कार्यकारिणीतील नाराज सदस्यांनी संस्थेच्या प्रमुखांना कोंडीत पकडले आहे. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तिघांवर मंगळवारी अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे या पदांचा निर्णय आता विश्वस्तांच्या न्यायालयात गेला आहे. साहित्य परिषदेच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीकडून अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष तसेच सातपैकी चार स्थानिक कार्यवाह विजयी झाले. परिवर्तन आघाडीकडून तीन स्थानिक कार्यवाह आणि २१ जिल्हा प्रतिनिधी विजयी झाले. सहा महिन्यांनी यातील नाराज सदस्य प्रमुख तीन पदाधिकाऱ्यांविरोधात एकत्र आल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. या नव्या आघाडीमुळे परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

‘पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव मांडायचा झाल्यास कार्यकारी मंडळाने तो दोन तृतीयांश बहुमताने व्यक्त केला पाहिजे,’ असे परिषदेच्या घटनेत म्हटले आहे. ३० जणांच्या कार्यकारी मंडळात २१ जणांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केल्याने बहुमत या सदस्यांकडे असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पद धोक्यात असल्याचे मानले जात आहे. मात्र, आधी स्वाक्षरी केलेल्या धुळे जिल्हा प्रतिनिधी संजीव गिरासे यांनी ‘पत्रात काय लिहिले आहे, हे मला माहीत नसल्याने स्वाक्षरी मागे घेत आहे,’ असे पत्र विद्यमान पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

‘अविश्वास ठरावाच्या कार्यवाहीपूर्वी संबंधित पदाधिकाऱ्याला बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना देऊन कार्यकारी मंडळाच्या सभेत ती मांडण्याची संधी दिली पाहिजे. अविश्वास ठराव कार्यकारी मंडळात (दोन तृतीयांश) बहुमताने मंजूर झाल्यास तसे संबंधित व्यक्तीस प्रमुख कार्यवाहाने कळवावे. त्यानंतर तो पदाधिकारी पदापासून मुक्त झाल्याचे समजण्यात येईल,’ असे घटनेत म्हटले आहे.

आता काय होणार?

‘अध्यक्षांसहित सर्व यांच्यापैकी कोणतेही पद रिक्त झाल्यास उर्वरित मुदतीसाठी कार्यकारी मंडळ सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. कार्यकारी मंडळ रिक्त जागेवर उर्वरित मुदतीसाठी संबंधित वर्गातील सभासदाची कार्यकारी मंडळ बहुमताने नियुक्ती करू शकतात,’ अशी तरतूद घटनेत असल्याने स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी यापैकी तिघे वरच्या पदांवर जाऊ शकतात. स्थानिक कार्यवाह पदांवरील रिक्त जागांवर स्वीकृत निवड करता येते.