जयंत सिन्हा यांची माहिती

पुरंदर विमानतळाचे बांधकाम आणि सुविधा या जागतिक दर्जाच्याच असतील. विमानतळ बनविताना आसपासच्या परिसराचा विकास आणि विमानतळाशी असलेली ‘कनेक्टिव्हिटी’ या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने पुरंदर विमानतळासाठी आता मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी दिली.

सध्याचा काळ ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ बनविण्याचा असून पुरंदर विमानतळ तसाच करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागेल. मात्र, राज्य सरकार भूसंपादन किती लवकर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परिसराचा विकास करताना विमानतळाला लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने कनेक्टिव्हिटी हा मुद्दाही भूसंपादनाइतकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून भविष्यातील ५० वर्षांचा विचार करीत हे जागतिक दर्जाचे विमानतळ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. खासदार अनिल शिरोळे आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा विचार सुरू आहे. सध्या दोन किलोमीटर लांबीची धावपट्टी असून लहान आकाराच्या विमानांचे उड्डाण होते. त्यामुळे धावपट्टीची लांबी वाढवून तीन किलोमीटर करण्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. ही धावपट्टी वाढली तर अधिकाधिक उड्डाणे होऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.

‘एअर इंडिया’सह आपल्या विमान कंपन्या फायद्यामध्ये आहेत. डिझेलच्या (एव्हिएशन टर्बाईन फ्यूएल) दरामध्ये ४० टक्क्य़ांनी घट झाली आहे. त्यामुळे विमानप्रवास किफायतशीर झालेला आहे. प्रवाश्यांच्या संख्येत ७० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. ‘हवाई चप्पल’ परिधान केलेले लोकसुद्धा ‘हवाई जहाज’मध्ये बसत आहेत, असेही सिन्हा यांनी सांगितले.

नवी ८५० विमाने घेणार

केंद्र सरकारची ‘उडान’ योजना यशस्वी झाली असून लहान शहरेदेखील हवाई मार्गानी जोडली जाऊ लागली आहेत. प्रत्येक ठिकाण विमान वाहतुकीने जोडले जावे, हा आमचा प्रयत्न आहे. देशात सध्या ५०० विमाने आहेत. सध्याच्या हवाई वाहतुकीची गरज ध्यानात घेता नवी ८५० विमाने विकत घेण्यात येणार असल्याचे जयंत सिन्हा यांनी सांगितले.