पुणे : सार्वजनिक रस्ता, पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत परवानाधारक फेरीवाला व्यावसायिकांनी व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन साधने आणि साहित्य हटवून जागा मोकळी ठेवणे अपेक्षित आहे. मात्र अशी कृती होत नसल्याने अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, स्वारगेट, रास्ता पेठ, सणस मैदान, मंडई पोलीस चौकी येथील अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अधिकृत फेरीवाल्यांना रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. व्यवसायाची वेळ संपल्यानंतर व्यवसायाचे साधन, साहित्य आणि अन्य गोष्टी हटविणे पदपथ आणि रस्त्यावरील जागा मोकळी करणे आवश्यक आहे. मात्र अधिकृत फेरीवाल्यांकडून जागा मोकळी केली जात नसल्याचे अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास आले होते. परवानधारक फेरीवाल्यांकडून अटी-शर्तीचे उल्लंघनही होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवसायाची साधने, साहित्य हटवून जागा मोकळी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांनी दिली.
दरम्यान, स्वारगेट, केईएम रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र लगत, सणस मैदान आणि मंडई पोलीस चौकी समोरील अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आठ हातगाडय़ा, पाच पथारी आणि अन्य विविध प्रकारचे अकरा प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले. यापुढे अशी कारवाई नियमित स्वरूपात करण्यात येणार आहे.