प्रकाश खाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेजुरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जेजुरीतून मार्गक्रमण करीत सोमवारी (२७ जून) महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत म्हणजे वाल्हे येथील मुक्कामी दाखल झाला. या ठिकाणीही सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले.

पहाटे माउलींची महापूजा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते झाल्यावर सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीतून वाल्हे गावाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. दौंडज खिंडीमध्ये नऊ वाजता पालखी सोहळा न्याहारीसाठी थांबला. याठिकाणी वारकरी बांधवांनी मटकीची उसळ, चटणी, भाकरी, चिवडा, भेळ, शंकरपाळी आदी पदार्थ खाऊन न्याहारी उरकली व थोडीशी विश्रांती घेतली.

कांदा-मुळा-भाजी ।

अवघीं विठाई माझी ॥

लसूण-मिरची-कोथिंबिरी ।

अवघा झाला माझा हरीं ॥

न्याहारी झाल्यावर पालखी सोहळा निघाला. यावेळी पावसाच्या हलक्याशा सरी आल्या. हवेत गारवा पसरला. वारकऱ्यांचा उत्साह मोठा होता. टाळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा माउलींचा जयघोष करीत विठ्ठल भेटीच्या ओढीने दिंड्या पुढे सरकत होत्या. जेजुरी ते वाल्हे हा टप्पा फक्त १२ किमीचा आहे. महर्षी वाल्मीकींची तपोभूमी असलेल्या वाल्हे नगरीत श्री. ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे दुपारी दीड वाजता आगमन झाले. यावेळी सरपंच अमोल खवले,उपसरपंच अंजली कुमठेकर, शिवसेनेचे सागर भुजबळ, भाजपचे सचिन लंबाते यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी तळावर वाल्हे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने माउलींच्या दर्शनासाठी आले होते. वाटेत दौंडज येथे ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.२८) सकाळी सहा वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांचे विधिपूर्वक स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.

विनोद तावडे वारीत सहभागी

दरवर्षी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात ज्ञानेश्वर माउलींच्या वारीमध्ये माजी मंत्री व भाजप नेते गेली बारा वर्षे चालत आहेत. सध्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना तावडे यांनी आपली वारी चुकवली नाही. राज्याच्या वाऱ्या होत असतात, योग्य लोक येत असतात पण महाराष्ट्रातील जनतेचे विठूरायाच्या वारीकडे लक्ष आहे असे ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauli ceremony maharshi valmiki tapobhumi trajectory enthusiastic welcome pune print news ysh
First published on: 27-06-2022 at 23:07 IST