पुणे : कलाकाराच्या पाठीमागे राहून स्वरमंचावरून सादर होणाऱ्या अभंगांच्या सूरांना अप्रतिम टाळवादनातून खुलविणारे माउली टाकळकर शनिवारी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी होते. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासह सर्व संगीत मैफलींमध्ये कलाकाराचा सत्कार स्वीकारण्यापूर्वीच स्वरमंचावरून हळूच बाहेर पडणाऱ्या माउलींना या वेळी मात्र सत्कार स्वीकारावा लागला! तरी, शिंदेशाही पगडीमध्ये ते काहीसे अवघडल्यासारखेच होते.
ग्रंथतुला, धान्यतुला आणि औक्षण करून सत्काराचा औपचारिक कार्यक्रम संपला आणि त्यानंतर त्यांना फक्त भेटण्यासाठी जमलेल्या गर्दीत मात्र ‘माऊली’ दिलखुलासपणे मिसळून गेले. मंचीय नसलेल्या या जिव्हाळमेळ्यात ‘शब्देविण संवादु’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या काव्यपंक्तीची प्रचिती सर्वांना आली.
निमित्त होते ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर उर्फ माउली टाकळकर यांच्या शंभराव्या वर्षातील अभीष्टचिंतन सोहळ्याचे. अखिल मंडई मंडळाच्या वतीने श्री शारदा गजानन मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात माउली टाकळकर यांची धान्यतुला आणि ग्रंथतुला करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नगरसेवक कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पंढरपूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ॲड. माधवी निगडे, कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बडदे, शांताराम निम्हण, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर या वेळी उपस्थित होते.
धान्यतुलेतील धान्य सहकारनगर येथील जवाहरलाल नेहरू वसतिगृहाला आणि पुस्तके आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाला देण्यात येणार आहेत. थोरात म्हणाले, वारकरी परंपरा जपणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. त्यांच्या शंभराव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना अधिकाधिक दीर्घायु आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून परमेश्वराची सेवा होवो.’ वांजळे म्हणाले, ‘कोणालाही शुभेच्छा देताना ‘जिवेत शरद: शतम’ असे आपण म्हणतो. पण, माउलींसाठी शत म्हणजे १२५ वर्षे आहेत. या अर्थाने त्यांची शताब्दी पाहण्याचे भाग्य लाभण्याची संधी परमेश्वराने आपल्या सर्वांना द्यावी.’
कोट
माउलींची जडणघडण मंडई विद्यापीठात झाली. या विद्यापीठातील प्रत्येक माणूस ग्रामीण शहाणपण घेऊन आला आहे. माउली हे वारकरी कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण. ते तत्त्वज्ञानाच्या भोवती केवळ फिरणारे नाहीत, तर तत्त्वज्ञान आचरणात आणणारे आहेत. वारकरी संप्रदायातील अद्वैत तत्त्वज्ञानाचे तेज माउलींच्या चेहऱ्यावर आहे आणि ते ज्ञान मिळविण्याची संधी आज आपल्याला या सोहळ्याच्या माध्यमातून मिळत आहे.
- उल्हास पवार
