maval agro organised indrayani rice exhibition in pune print news psg 17 zws 70 | Loksatta

पुणे : सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन; सोमवारपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सव

या प्रदर्शनात तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांनाच वाटप करणार आहे

पुणे : सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन; सोमवारपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सव
(संग्रहित छायाचित्र) फोटो सौजन्य : लोकसत्ता

मावळातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या मावळ ॲग्रोच्या वतीने सोमवारपासून (१२ डिसेंबर) अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच, दहा आणि ३० किलोमध्ये हा तांदूळ उपलब्ध होणार असून ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तो विक्रीसाठी असणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन करून अशा प्रकारे विक्री करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

पीडीसीसीचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मावळ ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे, संचालक रमेश थोरात आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) विजय टापरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण

मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत असल्यामुळे सध्या बाजारात अनेकदा इंद्रायणी तादळांची भेसळ करून विक्री होते. त्यामुळे अस्सल इंद्रायणी तांदूळ ग्राहकांना मिळावा, यासाठी मावळ तालुक्यातील ५५ विकास सोसायट्यांच्या माध्यमातून भाताची पेंडी विकत घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी पीडीसीसीकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज या विकास सोसायट्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल (हमीभावापेक्षा) जादा दर देऊन भाताच्या पेंढ्या विकत घेतल्या. त्यावर सर्व प्रक्रिया करून तांदळाची निर्मिती केली. त्याची विक्री करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजाराचे प्रवेशाद्वार येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांनाच वाटप करणार आहे, असे दाभाडे यांनी सांगितले.

बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे म्हणाले, की भात पिकासाठी प्रथम अशा प्रकारे बँकेकडून दहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तांदळाची विक्री झाल्यानंतर आलेल्या पैशातून सोसायट्या कर्जाची परतफेड करणार आहेत. प्रथमच बँकेकडून अशा प्रकारचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:42 IST
Next Story
पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण