Maharashtra ZP Election Panchayat Samiti Election Results 2026: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. दहापैकी दहाही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. जिल्हा परिषेद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सदस्य निवडून आला नसून सुफडासाफ झाला आहे. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके म्हणाले, मावळच्या जनतेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि मावळ पंचायत समितीमधील दहाही गणातील उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मावळच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. हा विजय अजितदादांना समर्पित करतो. मावळची जनता प्रामणिक, इमानदार असून त्यांनी मतदानातून दाखवून दिले आहे.

प्रचारामध्ये भाजपने घड्याळाची टिकटिक बंद करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत विचारले असता आमदार सुनील शेळके म्हणाले, माजी आमदार बाळा भेगडे आणि भाजपने मावळ तालुक्यात गलिच्छ राजकारण सुरु ठेवले आहे. स्वत:चे कुटुंब, आर्थिक व्यवस्था सक्षम करायची आणि दुसऱ्याच्या कुटुंबात भांडणे लावायची. दुसऱ्यांची कुटुंबे आर्थिक उधवस्त करत आहेत. यापुढे तरी मावळच्या सर्वसामान्य जनतेला अडचणीत, संकटात टाकू नये. आर्थिक खड्ड्यात घालू नये. अशा पद्धतीचे राजकारण बाळा भेगडे आणि मावळ तालुक्याला अशोभनीय आहे.

आगामी काळात मावळच्या सर्वसामान्य जनतेचा विचार करुन प्रत्येकाला कशा पद्धतीने न्याय देता येईल, ही भूमिका घेऊन राजकारण करावे. मावळच्या जनतेने अजितदादांच्या रुपाने, मी करित असलेल्या कामावरील विश्वासाने मतरुपी आशिर्वाद दिला आहे. ग्रामीण भागातील जनतेला विकासकामात न्याय दिला पाहिजे. या मतामधून उतराई होण्यासाठी विजयी सदस्यांना पाच वर्षे जनतेची सेवा करावी लागेल. त्यांच्या अडचणी, सुख, दु:खात उभे राहण्याची सूचना आमदार सुनील शेळके यांनी विजयी उमेदवारांना केली.