पिंपरी : कामगार दिनाच्या सुटीनिमित्त फिरण्यासाठी आलेल्या तिघांचा ‘सेल्फी’ काढताना मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

अजय गारुडे (वय २८), संतोष येडके (वय ३०) आणि अनिकेत पवार (वय २५, सर्व रा. भोसरी) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी याबाबत माहिती दिली. भोसरीतील एका कंपनीत काम करणारे सहा तरुण शुक्रवारी जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तरुण धरणातील पाण्यात उतरून ‘सेल्फी’ काढत होते. त्यांना पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यात एकाचा पाय खोल पाण्यात गेला. त्याच्याबरोबर सगळेच खोलवर पाण्यात गेले.

वन्यजीव रक्षक, शिवदुर्ग मित्र यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले. एकाला पोहता येत होते, त्यामुळे तो बाहेर आला. मात्र, इतर तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांनाही पोहता येत नव्हते. दरम्यान, कोटेश्वरवाडीत पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेला एक तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याचा मृतदेह सापडला नसून, शोधकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सावरदरी येथील एका कंपनीजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत एक ५२ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (२९ एप्रिल) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे वडील हे कामावर जात असताना, आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे चालवून त्यांना धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या वडिलांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हाड फॅक्चर झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शाकापुरे करीत आहेत.  

गांजा ओढताना तिघांना रंगेहात पकडले

सार्वजनिक बागेत गांजाचे सेवन करणार्‍या तीन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी ( ३० एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुभाष राजेंद्र गुरव यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल बसवराज चमड्डेरी (वय २४), सेफ अब्बास सय्यद (वय २१) आणि जॉश्वा राजेश नायर (वय २०) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये हे तिघे जण सिमेंटच्या बाकावर बसून प्लास्टिकच्या चिलिममधून गांजा ओढत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे करत आहेत.