Maval Panchayat Election Results 2026: मावळ तालुक्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घौडदौंड कायम ठेवली आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. पंचायत समितीमधील दहाही गणांमधील उमेदवार विजयाच्या समिप असून घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत. मावळ पंचातय समितीचे दहा गण आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३ पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. मागीलवेळी भाजपचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, तर पंचायत समितीमध्ये सात सदस्यांसह भाजपची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ तीन सदस्य होते. मावळ पंचायत समितीवर सलग २० वर्षांपासून असलेल्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे.

मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँगेसचा झेंडा

सलग २० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ पंचायत समितीवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी मावळ भाजपने कंबर कसली होती, तर विधानसभेतील सलग दोन वेळा झालेल्या विजयानंतर मावळ पंचायत समितीवर झेंडा लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावली होती. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मावळ पंचायत समितीमध्ये सन १९९२ मध्ये काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती व उपसभापती निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी सभापतिपदी भाजपचे एकनाथ तिळे व उपसभापतिपदी भाजपच्या रुपलेखा ढोरे यांची चिठ्ठी निघाली आणि मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली होती. त्यानंतरच्या पाच वर्षात म्हणजे सन १९९७ ते २०२२ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.

दरम्यान, सन २००२ मध्ये मावळ पंचायत समितीवर पुन्हा भाजपची सत्ता आली ती सलग २० वर्षे म्हणजे सन २०२२ पर्यंत कायम राहिली. आता २० वर्षांनी भाजपची सत्ता गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व म्हणजेच दहाही सदस्य निवडून आले असून एकहाती सत्ता आली आहे.