पिंपरी : मावळ तालुक्यातील पाटण गावात आज सोमवारी (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील इतर दोन सदस्य अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले . या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पुणे येथील पाचव्या व्या बटालियनची मदत मागविण्यात आली . त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे त्यात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी व २७ जवान पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या या ठिकाणी बचावकार्य राबवले जात आहे.

एनडीआरएफच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले आहे आणि इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी माहिती दिली की, अतिवृष्टीमुळे दुर्गम भागात तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष – लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

  • टोल फ्री हेल्पलाईन : १०७७
  • मोबाईल : ९३७०९ ६००६१ पुणे महानगरपालिका (PMC)
  • ०२०-२५५०१२५९
  • ०२०-२५५०६८००
    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)
  • ०२०-६७३३११११ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)
  • ९५४५२ ८२९३०

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.