पुणे : आरएमके समूहाच्या माध्यमातून मावळ तालुक्यात या वर्षात २ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, त्यातून ४ हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. या गुंतवणुकीत प्रामुख्याने एनर्जी इन मोशन, व्हिस्टिऑन, एनडीएस, पीटीएल, अमेय फिनिशिंग सोल्यूशन्स, रिव्होल्टेक, के-नेस्ट, डब्ल्यू अँड डी, बोरटेक आणि मान अँड हमेल या कंपन्यांचा समावेश आहे. यातील एनर्जी इन मोशन कंपनीच्या प्रकल्पाचे उद्घाटन उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे, अशी माहिती आरएमके समूहाचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी दिली.

पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक बनवणाऱ्या एनर्जी इन मोशन या कंपनीच्या आंबी (ता. मावळ) येथील आरएमके इंडस्ट्रियल पार्कमधील प्रकल्पाचे उद्घाटन उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल, असे काकडे यांनी सांगितले.

एनर्जी इन मोशन ही कंपनी अवजड मालवाहतुकीसाठी बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक तयार करते. कंपनीचा ५५ टन क्षमतेचा ‘अश्वा’ इलेक्ट्रिक ट्रक सुमारे सात मिनिटांत संपलेली बॅटरी बदलून पुन्हा प्रवासासाठी सज्ज होतो, त्यामुळे वाहतुकीतील वेळ वाचतो आणि डिझेलचा वापर व प्रदूषण कमी होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला (जेएनपीए) कंपनी इलेक्ट्रिक ट्रकचा पुरवठा करत असून, मुंबई–पुणे महामार्गावरही हे ट्रक लवकरच धावणार आहेत.

सात वर्षांत १० हजार कोटींची गुंतवणूक

आरएमके समूहाकडून मावळमध्ये गुंतवणूक आकर्षित केली जात आहे. यासाठी समूहाकडून कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली जात आहे. मावळमध्ये येणाऱ्या उद्योगांना सर्व आवश्यक सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देण्याचे काम समूह करीत आहे. मागील सात वर्षांत आरएमके समूहाच्या माध्यमातून मावळ तालुक्यात १० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आली असून, त्यातून १० हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. समूहाने या उद्योगांसाठी ११.२ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. इटली, फ्रान्स, जपान, अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवान आदी देशांतील कंपन्यांनी मावळमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मावळ तालुका आंतरराष्ट्रीय उद्योगजगताच्या नजरेत ठळकपणे आला आहे, असे रामदास काकडे यांनी नमूद केले.