नाटय़मय घडामोडींमुळे राज्यभरात चर्चेला आलेल्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांचा एक लाख ५८ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत आलेले राहुल नार्वेकर यांचा बालेकिल्ल्यातच दारुण पराभव झाला असून त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुणे जिल्ह्य़ातील चिंचवड, पिंपरी, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, कर्जत विधानसभा क्षेत्र मिळून तयार झालेल्या मावळ लोकसभेच्या रिंगणात १९ उमेदवार होते. सुरुवातीपासून राजकीय उलथापालथ होत राहिल्याने मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहिला. आझम पानसरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, लक्ष्मण जगतापांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून केलेली शेकापशी सोयरीक, विद्यमान खासदार असूनही शिवसेनेने कापलेले गजानन बाबरांचे तिकीट, बारणेंची वर्णी लागताच तिकीट विकल्याचा आरोप, शिवसेना-शेकापची तुटलेली युती, बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीकडून उमेदवाराची शोधाशोध, ‘डमी’ उमेदवारांचा ‘घोळात घोळ’, विधान परिषदेच्या निवडणुकीत गळाला लागलेला मासा आणि नार्वेकरांना मावळ विधानसभेची उमेदवारी, एकाच नावाचे अनेक उमेदवार, काँग्रेसचे असहकार ‘नाटय़’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘दिवसा एक व रात्री एक’ असा प्रचार, अजितदादांची कथित दमदाटी, साहेबांकडून जगतापांची खरडपट्टी, बाबरांचा समर्थकांसह मनसेत प्रवेश, शिवसेनेच्या तीन नगरसेविकांची हकालपट्टी, ठाकरे बंधूंचे ‘प्रचारयुद्ध’, स्थानिक मुद्दे आणि नात्यागोत्याचे राजकारण आणि पैशांचा धूर यासारख्या अनेक घटनांमुळे मावळात ‘संशयकल्लोळ’ होता.
बारणे व जगताप यांच्यातील वरकरणी वाटणारी चुरशीची लढत प्रत्यक्षात एकतर्फीच ठरली. देशभरातील मोदी लाटेचा प्रभाव बारणे यांच्या पथ्यावर पडला. २००९ साली चिंचवड विधानसभेत जगतापांकडून सहा हजाराने पराभूत झालेल्या बारणेंनी लोकसभेत जगतापांना दीड लाखाने धूळ चारून उट्टे काढले. जगतापांचे प्रभावक्षेत्र असलेल्या चिंचवड विधानसभेतच ६५ हजार आणि जगतापांच्या नात्यागोत्याचे जाळे असलेल्या पिंपरी मतदारसंघात ५७ हजाराचे मताधित्य बारणे यांनी घेतले. कोणताही बडा नेता बरोबर नसताना लढत दिलेल्या जगतापांनी उरणमध्ये २२ हजाराचे, तर पनवेलला ११ हजाराचे मताधिक्य घेतले. मावळात अनपेक्षितपणे चांगली मते घेतली, तरी मताधिक्य बारणेंच्या पारडय़ात पडले. हक्काच्या िपपरी-चिंचवड भागातून जगतापांना अपेक्षित मतदान झाले नाही. दुसरीकडे, सर्वपक्षीय नेत्यांचा ‘हातभार’ बारणे यांना लाभल्याने जगतापांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
श्रीरंग बारणे (महायुती) – ५ लाख १२ हजार २२६
लक्ष्मण जगताप (शेकाप) – ३ लाख ५४ हजार ८२९
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) – १ लाख ८२ हजार
मारुती भापकर (आप) – ३० हजार ५६६
टेक्सास गायकवाड (बसपा) – २५ हजार ९८२

‘डमी’ उमेदवारही जोरात
कुरघोडीचे राजकारण व एकमेकांची मते कमी करण्याच्या खेळीचा एक भाग म्हणून मावळमध्ये लक्ष्मण जगताप नावाचे तीन तर श्रीरंग बारणे नावाचे दोन उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढतीतील उमेदवारांव्यतिरिक्त असलेले अन्य ‘डमी’ उमेदवारांच्या खात्यातही भरपूर मते जमा झाली आहेत. लक्ष्मण मुरलीधर जगताप यांना १,६०० मते मिळाली तर लक्ष्मण सीताराम जगताप यांना ८,७६५ मते मिळाली. त्याचप्रमाणे, श्रीरंग चिमाजी बारणे यांना ११,२५९ मते मिळाली आहेत.