पिंपरी : मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता येवले आणि उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीवर ३३ वर्षांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (अजित पवार) झेंडा फडकला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये सभापती येवले आणि कारके यांनी पदभार स्वीकारला. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रमेश साळवे, विठ्ठल शिंदे, बबन भेगडे, गणेश ढोरे, पुजा बुट्टे, दिपक हुलावळे, नारायण भालेराव यावेळी उपस्थित होते.

मावळ पंचायत समितीची सदस्य संख्या दहा आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दहाही सदस्य निवडून आले आहेत. भाजपचा एकही सदस्य निवडून आला नाही. भाजपला २० वर्षांची सत्ता गमवावी लागली. निकालाच्या दिवशीच आमदार शेळके यांनी सभापतीपदासाठी येवले आणि उपसभापतीपदासाठी कारके यांच्या नावाची घोषणा केली होती.  त्यानुसार  सभापतीपदासाठी येवले आणि उपसभापतीसाठी कारके यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते. दोघांचीही बिनविरोध निवड झाली.

‘मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा ३३ वर्षांनी झेंडा फडकला आहे.  तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी जोमाने काम करतील’, असा  विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी विद्या मोहिते ; उपसभापतीपदी मंगेश सावंत खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या (ठाकरे) विद्या  मोहिते आणि उपसभापती पदी मंगेश सावंत यांची निवड झाली. सभापती मोहिते आणि उपसभापती सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांचा दोन मतांनी पराभव केला.

आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, विनया मुंगसे, गणेश आरगडे यावेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत खेडच्या १६ पैकी नऊ जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाने जिंकल्या होत्या. एकहाती सत्ता मिळवत आमदार काळे यांनी वर्चस्व निर्माण केले होते.

 सभापती आणि उपसभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेकडून सभापतीपदासाठी मोहिते आणि उपसभापतीपदासाठी सावंत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अश्विनी तरस यांनी सभापतीपदासाठी आणि निखिल थोरवे यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या उमेदवारांना नऊ मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी सात मते मिळाली. निवडणूक अधिकारी अनिल दौंडे यांनी सभापतीपदी शिवसेनेच्या मोहिते आणि उपसभापतीपदी सावंत यांच्या निवडीची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवारात भांडऱ्याची उधळण करीत जल्लोष केला.