लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदार म्हणून नव्याने नावनोंदणी झालेल्या मतदारांमध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ातील २१ पैकी तब्बल १७ विधानसभा मतदारसंघात महिलांनी नव्याने नावनोंदणीत पुरुष मतदारांना मागे टाकले आहे. एकूण मतदारांमध्ये सर्वच ठिकाणी पुरुष मतदारांची संख्या अधिक असताना कसबा विधानसभेत मात्र महिलांनी बाजी मारली असून, या मतदार संघात एकूण मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने मतदारनोंदणीचे अभियान सुरू करण्यात आले होते. ही मतदार नोंदणी अद्यापही सुरूच आहे. नव्याने नावनोंदणी करण्याबरोबरच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाव वगळले गेलेल्या मतदारांची नोंदणीही या काळात करण्यात आली. ३१ जुलैपर्यंत झालेल्या नावनोंदणीमध्ये महिलांची संख्या जात असल्याने ते एक वैशिष्टय़ ठरले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुरुष मतदारांची संख्या ३४ लाख ६६ हजार २८५, तर महिला मतदारांची संख्या ३० लाख ९८ हजार ८६९ होती. नव्याने नोंदणीनंतर पुरुष मतदारांची संख्या ३५ लाख ९० हजार १५४, तर महिला मतदारांची संख्या ३२ लाख ३० हजार ९१५ झाली.
नव्या मतदार नोंदणीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदार नोंदणी अधिक झाली आहे. २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख २७ हजार ८६९ पुरुष मतदारांची नोंदणी झाली. नव्याने नोंदणी झालेल्या महिला मतदारांची संख्या १ लाख ३२ हजार ४८ इतकी आहे. त्यामुळे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा ४ हजार १७७ इतकी अधिक आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाणही बदलले आहे. लोकसभेत ते सरासरी ८९५ होते, तर आता ते ९०० झाले आहे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे जिल्ह्य़ातील सर्व मतदार संघांमध्ये कसबा विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांमध्ये महिलाच आघाडीवर असल्याचे दिसते. कसब्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार १८८, तर महिला मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार ५५२ इतकी आहे. म्हणजेच या ठिकाणी पुरुषांपेक्षा ३६४ महिला मतदार जास्त आहेत. नव्याने नोंदणीतही पुरुषांपेक्षा सुमारे हजार महिला मतदारांनी नव्याने नोंदणी केली आहे. त्यामुळे या मतदार संघात पुरुष-महिला गुणोत्तर १००० : १००३ असे झाले आहे.

 
नव्याने नावनोंदणी झालेले मतदार (३१ जुलैपर्यंत)
मतदार संघ        पुरुष मतदार            महिला मतदार
जुन्नर                २४९८            २८१४
आंबेगाव            ३५८३            ३९७४
खेड-आळंदी            ५४५२            ५७७३
शिरूर            ४५८५            ४८७५
दौंड                ३०४४            ३२३३
इंदापूर            १९६४            २०६६
बारामती            ३३३९            ३५०६
पुरंदर                ५८११            ५७८७
भोर                ४२७७            ३६२२
मावळ            ४२३२            ४७५३
चिंचवड            १२७१८            १२८२४
िपपरी                ४६५०            ४९४५
भोसरी            १०३८८            ९५१५
वडगाव शेरी            ८३४८            ८६८०
शिवाजीनगर            ४६६९            ५१५१
कोथरूड            ८५४८            ९०३०
खडकवासला            ११२७४            १०७५८
पर्वती                ७१४०            ७७९१
हडपसर            ९८४१            ९८०८
पुणे कॅन्टोन्मेंट            ६६८३            ७२४३
कसबा पेठ            ४८२५            ५८९८
एकूण                १,२७,८६९         १,३२,०४८