दर तीन महिन्यांनी बैठक घ्या, महापालिकेच्या कार्यक्रमांना सन्मानाने बोलवा, प्रत्येकाला ओळखपत्र द्या आदी मागण्या पिंपरीच्या माजी महापौरांनी विद्यमान महापौर शकुंतला धराडे आणि आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केल्या आहेत. माजी महापौरांनी यापूर्वी केलेली पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्ह्य़ाचा दर्जा देण्याची मागणी कागदोपत्रीच राहिल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.
महापौरांच्या दालनात शहरातील माजी महापौरांची बैठक झाली. शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर रंगनाथ फुगे, तात्या कदम, कविचंद भाट, हनुमंत भोसले, आर. एस. कुमार, अनिता फरांदे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, आयुक्त राजीव जाधव, नगरसेवक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
आपल्या व्यथा मांडतानाच विद्यमान नेतृत्वाकडून माजी महापौरांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. अधिकारी वर्ग बदलला आहे, त्यांच्याशी परिचय नाही, कामे होत नाहीत, अशी तक्रार बैठकीत झाली, त्यानंतर आयुक्तांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी सर्वाची ओळख करून दिली. काही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. महापौर धराडे म्हणाल्या, शहराचा चेहरामोहरा बदलण्यामागे माजी महापौरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग व्हावा, या हेतूने ही बैठक बोलावली.
 पुन्हा एकदा महापौरांचे निवासस्थान
पिंपरी-चिंचवडच्या महापौरांसाठी स्वतंत्र निवासस्थान असावे, यासाठी प्राधिकरणात राखीव भूखंड आहे. मात्र, आतापर्यंत हा विषय गांभीर्याने गुंडाळून ठेवण्यात आला होता. या बैठकीच्या निमित्ताने निवासस्थानाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. महापौरांचे निवासस्थान व्हावे, अशी मागणी या बैठकीत झाली. त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्याची तयारी आयुक्तांनी दर्शवली.