महापौर चषक कुस्ती स्पर्धा वादात
पुणे महापालिकेच्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीच्या जेवणावळी आणि अन्य बाबींसाठीच कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांसाठी अवघे ४७ लाख तर खेळाडू, पंच यांचा निवास, भोजन, प्रवास, मानधन, छायाचित्रणासह व्हिडिओ शूटिंग, मंडप आणि जाहिरातीवरच तब्बल एक कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेसाठी पथ विभागाकडील ७५ लाखांची रक्कमही वर्गीकरणासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे महापौर चषक कुस्ती स्पर्धा वादात सापडण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या वतीने येत्या ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे खराडी येथे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.
कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या मैदानात अनुषंगिक सर्व सोयी उपलब्ध असातनाही मंडप, गॅलरी, पोडियम यासाठी तब्बल १२ लाख ६१ हजार ७०० रुपयांच्या खर्चाचा घाट घालण्यात आला आहे, तर एलईडी दिवे, फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी ११ लाख ८६ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. लाईट व्यवस्थेसाठी १५ लाख ५१ हजार ५०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर खेळाडूंसाठी निवास आणि प्रवासासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी न करून घेण्याची उपसूचनाही स्थायीमध्ये मान्य करण्यात आली.
या स्पर्धेत १९ देशातील खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.