पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या फुटलेल्या पेपरची परीक्षा आता १४ जूनला घेण्यात येणार असून यापुढे प्रत्येक परीक्षेला विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी दिली.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केली होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्येही प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रथम वर्षांची मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिम या विषयाच्या १० मे रोजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध झाले. त्या पाश्र्वभूमीवर ही परीक्षा १४ जून रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सर्वच पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली होती. मात्र, एकाच विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे पुरावे समोर आल्यामुळे तेवढय़ाच विषयाची परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा निर्णय आहे. त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी वर्गात बसणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाइल वापरालाही बंदी घालण्यात येणार आहे.
प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवण्याच्या पद्धतीमध्येही बदल करण्यात येणार आहेत. यापुढे प्रश्नपत्रिकेची सॉफ्ट कॉपी विद्यापीठात आधीपासून ठेवली जाणार नाही. प्रश्नपत्रिका काढणाऱ्या शिक्षकांनी प्रश्नपत्रिका हाताने लिहून ती विद्यापीठाकडे द्यायची आहे. त्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत ही प्रश्नपत्रिका सांभाळण्याची जबाबदारी विद्यापीठाची राहणार आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका छपाईसाठी पाठवण्यात येईल. प्रश्नपत्रिकेची सॉफ्ट कॉपी अगदी आयत्या वेळी तयार करून ती अपलोड करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही परीक्षेपूर्वी अर्धा तास म्हणजे विद्यार्थी त्यांच्या वर्गात बसल्यानंतर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याचा पासवर्ड देण्यात येणार आहे. मात्र, फक्त अध्र्या तासात प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याच्या पुरेशा प्रती काढून ती वेळेत विद्यार्थ्यांना वाटण्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहणार आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका डाऊनलोड होण्यामध्ये अडचणी येत असल्याच्या महाविद्यालयाच्या तक्रारी होत्या. त्या पाश्र्वभूमीवर पुढील परीक्षेच्या वेळी एकाच वेळी अनेक प्रश्नपत्रिका पाठवण्याचा ताण येऊ नये, अशा प्रकारे वेळापत्रक तयार करण्यात येईल, असेही गाडे यांनी सांगितले.