पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मार्गदर्शन, मदतीसाठी सुरू केलेल्या ‘एमएसएमई हेल्पलाइन’ने दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे उद्योजकांसाठी विनामूल्य असलेल्या या उपक्रमाचा आता राज्यातील सर्व जिल्ह्यांसह देशभरातील २९ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्येही विस्तार झाला आहे.

एमएसएमई उद्योजकांना व्यवसाय करताना विविध सरकारी योजना, उद्योग आधार अर्थात उद्यम नोंदणी, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुपालन, कर्ज व वित्तपुरवठा, सरकारी ई-मार्केटप्लेस (जेम)वर नोंदणी, विपणन, तसेच आयात-निर्यात प्रक्रिया अशा विविध टप्प्यांतून जावे लागते. मात्र, माहितीचा अभाव, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होणे, योग्य वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन न मिळणे अशा कारणांनी उद्योजकांच्या संधी गमावल्या जातात, निधी उपलब्धतेपासून विविध स्तरांवर अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘एमसीसीआयए’ने पुढाकार घेऊन ‘एमएसएमई हेल्पलाइन’ या अनोख्या संकल्पनेद्वारे उद्योजकांना विनामूल्य आणि एकाच छताखाली विविध प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.

एमसीसीआयएने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ हजारांहून अधिक एमएसएमईंनी १० हजारांहून अधिक ऑनलाइन सल्लामसलती किंवा मार्गदर्शन सत्रे पूर्ण केली आहेत. एमसीसीआयएने उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी १४० तज्ज्ञ नियुक्त केले आहेत. हेल्पलाइनशी संपर्क साधलेल्या उद्योजकांमध्ये १२१५ महिलांचा समावेश आहे. व्यवसाय नोंदणी, जीएसटी, कर्ज व वित्तपुरवठा, विपणन, आयात-निर्यात प्रक्रिया अशा विविध घटकांबाबतचे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने तज्ज्ञांमार्फत उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील उद्योजकांसह देशभरातील छोट्या, मध्यम शहरातील उद्योजकांनाही या उपक्रमातून मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.

‘एमएसएमई हेल्पलाइनने दहा हजार सल्लामसलती किंवा मार्गदर्शन सत्रे पूर्ण करण्यातून उपक्रमाची उपयुक्तता दिसून येते. उद्योगाचा आकार किंवा भौगोलिक स्थान काहीही असले, तरी सुलभ रितीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. एमएसएमईच्या समस्या सोडवणे, त्यांना संधी मिळवून देणे, योग्य व्यावसायिक निर्णय घेण्यासाठीची मदत देशाच्या उद्योग क्षेत्राला आणि एमएसएमईला अधिक सक्षम करणारी आहे. – प्रशांत गिरबाने, महासंचालक, एमसीसीआयए

केंद्र सरकारकडूनही दखल…

एमसीसीएआयएच्या ‘एमएसएमई हेल्पलाइन’ या उपक्रमाची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. केंद्र सरकारच्या एमएसएमई चॅम्पियन्स या संकेतस्थळावर ‘रिसोर्स फॉर चॅम्पियन्स’अंतर्गत ‘एमसीसीआयए हेल्पडेस्क’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

सर्वाधिक मार्गदर्शन कशासाठी?

एमएसएमईसाठीच्या सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्याकडे उद्योजकांचा सर्वाधिक कल आहे. त्या खालोखाल ब्रँडिंग आणि विपणन, उद्योग उभारणी आणि अनुपालन, सरकारी ई मार्केटप्लेस, आयात निर्यातीबाबत जाणून घेण्यासाठी उद्योजक ‘एमएसएमई हेल्पलाइन’ला संपर्क साधत असल्याचे दिसून येते.