पुणे : गेल्या आर्थिक वर्षात पुण्यात वाहन निर्मिती क्षेत्रापेक्षा संरक्षण उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला गती मिळाल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. याचबरोबर व्यापार आणि सेवा क्षेत्रापेक्षा निर्मिती क्षेत्रातील उद्योगांची कामगिरी चांगली राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

‘एमसीसीआयए’ने पुण्यातील १५२ कंपन्यांची आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील कामगिरी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यात वाहननिर्मिती, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा, अन्न व कृषी, अभियांत्रिकी यासह इतर क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी ४३ टक्के कंपन्या सूक्ष्म, २२ टक्के कंपन्या लघु, २६ टक्के कंपन्या मध्यम आणि १० टक्के कंपन्या मोठ्या आहेत. या सर्वेक्षणात कंपन्यांकडून नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षातील विक्रीतील वाढीची अपेक्षा जाणून घेण्यात आली. त्यात कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १०.३६ टक्के वाढीची अपेक्षा नोंदविली.

सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी ३१ टक्के कंपन्या निर्यात करणाऱ्या आहे. या निर्यातदार कंपन्यांतील ७० टक्के कंपन्यांनी निर्यातीत वाढ झाल्याचे नमूद केले. क्षेत्रनिहाय विचार करावयाचा झाल्यास वाहननिर्मिती क्षेत्रापेक्षा संरक्षण उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने जास्त वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी ११.५५ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला असून, त्या खालोखाल व्यापार ९.८७ टक्के आणि सेवा ९.५७ टक्के वाढीचा अंदाज आहे. पुण्यातील कंपन्या वाढीबाबत आशावादी असून, त्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) प्रमाण लक्षणीय असल्याचे चित्र सर्वेक्षणात दिसते आहे.

अमेरिकेच्या आयात शुल्क परिणांमावर चर्चा

‘गेल्या आर्थिक वर्षातील कंपन्यांची प्रगती समाधानकारक आहे. असे असले, तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जशास तसे आयात शुल्क आकारण्यात येत असून, त्यावर चालू आर्थिक वर्ष कसे जाईल, हे अवलंबून असेल. त्यावर ‘एमसीसीआयए’मध्ये पुढील महिन्यात अनेक चर्चासत्रे घेण्यात येणार आहे. अमेरिकेचे जास्त आयात शुल्क आणि त्याचा विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम यावर चर्चा केली जाईल. या माध्यमातून काही उद्योग त्यांचे अनुभव मांडतील आणि त्यातून इतर उद्योगांना शिकता येईल,’ अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.

‘आत्मनिर्भर भारत’मुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात वाढ होत आहे. यामुळे पुण्यात संरक्षण उत्पादन क्षेत्रात अनेक नवीन कंपन्या सुरू होत आहेत. त्याच वेळी अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांतील कंपन्या संरक्षण उत्पादनात विस्तार करीत आहेत. त्यामुळे त्यातील वाढीला गती मिळाली आहे.- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए