पुणे : दहशतीसाठी, तसेच प्रतिस्पर्धी टोळीतील जुन्या वादातून अल्पवयीन मुलांकडून दोन तरुणांवर हल्ला करून एकाचा खून घडवून आणणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरातील गुंड आकाश थोरात आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायदा) कारवाई करण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षांत दहा गुन्ह्यांची नोंद असलेल्या या टोळीत सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आकाश भरत थोरात (वय ३२, रा. सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय २४), आदित्य जालिंदर शिंदे (वय १८), रोहित बाळासाहेब कचरे (वय २१), विशाल ऊर्फ मोड्या दीपक गणेचारी (वय २१) यांच्यासह सहा अल्पवयीन मुले यांच्यावर कारवाई झाली आहे.
आंबेगाव खुर्द परिसरात थोरात आणि त्याच्या टोळीची दहशत आहे. दहशत माजवून आर्थिक फायद्यासाठी या टोळीने गुन्हे केले आहेत. थोरात याने टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आकाश थोरात आणि त्याच्या इतर साथीदारांनी सहा अल्पवयीन मुलांकडून दोन तरुणांवर हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात एका तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास केल्यानंतर आकाश थोरात संघटित गुन्हेगारी करत असल्याचे दिसून आले.
प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती. त्यामुळे या टोळीवर ‘मोक्का’नुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करून शरद झिने यांनी परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. त्यानुसार टोळीवर ‘मोक्का’ कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला.