पुणे : हडपसरमधील सय्यदनगर भागातील उपाहारगृह चालकाला दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता मागणारा गुंड टिपू पठाण याच्यासह आठ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. टिपू पठाण टोळीविरुद्ध करण्यात आलेली ही तिसरी ‘मकोका’ कारवाई आहे.
हडपसरमधील सय्यदनगर भागात रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकाविणे, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पठाणसह साथीदारांविरुद्ध दाखल आहे. पठाणसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती.
१६ फेब्रुवारी पठाण आणि साथीदारांनी सय्यदनगर भागातील ख्वाजा मंझिल इमारतीत असलेल्या कार्यालयात उपाहारगृह चालकाला बोलावून घेतले. उपाहारगृह चालकाला व्यवसाय करायचा असेल तर, दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती.
हप्ता न दिल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी त्याला दिली होती. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पठाणसह साथीदारांविरुद्ध मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.
दरम्यान, या गुन्ह्यात फरार असलेल्या पठाण टोेळीतील सराइत फैजान उर्फ पच्चीस शेख याला अटक केली. सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे तपास करत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त डाॅ. राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमित शेटे, हवालदार राजेंद्र वाघमारे, दादासाहेब नाळे, परशुराम पिसे, अमोल फडतरे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.
दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड
दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पर्वती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. अजित सागर कसबे (वय २१, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कसबे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तूल बाळगले असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळाली. त्यानंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, सूर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे यांनी ही कारवाई केली.
