पुणे: जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी स्थानक परिसरात प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ६५ टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. किशोर उत्तम गायकवाड (वय १९), आशिष संतोष सोजवळ (वय २४), जाॅर्ज डाॅमनिक डिसुजा (वय १९), अजय सुरेश गाडेकर (वय २०, चौघे रा. बोपोडी, मुंबई-पुणे रस्ता ) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका दुचाकीस्वार तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण पुणे- मुंबई रस्त्याने निघाला होता. बोपोडी परिसरात गायकवाड, सोजवळ, डिसुजा, गाडेकर यांनी त्याला अडवले. आमचा मित्र आजारी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करा, अशी बतावणी चोरट्यांनी तरुणाकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला पकडले आणि खिशातील मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. हेही वाचा. लोणावळ्यात हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; हैदराबादमधील तिघेजण ताब्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने तपास करुन आरोपी गायकवाड याच्यासह साथीदारांना पकडले. गायकवाड आणि साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस आले. गायकवाड आणि साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हेही वाचा. भोसरीतील वीज समस्या सुटणार, महावितरणने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीस पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.