Measles survey Municipal Corporation health department claims no patient pune print news ysh 95 | Loksatta

महापालिकेकडून गोवर आजाराचे सर्वेक्षण; दाट लोकवस्ती भागात एकही रुग्ण नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा

गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या पथकांकडून कोंढवा, भवानी पेठ, येरवडा आणि आंबेगाव येथील दाट लोकवस्ती भागात सर्वेक्षण करण्यात आले.

measles maharashtra
महापालिकेकडून गोवर आजाराचे सर्वेक्षण(Express Photo)

पुणे : गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या पथकांकडून कोंढवा, भवानी पेठ, येरवडा आणि आंबेगाव येथील दाट लोकवस्ती भागात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला नसला तरी प्राथमिक माहितीनुसार सर्वेक्षणात गोवर आजाराचा एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.

राज्यात भिवंडी, मुंबई आणि मालेगांव येथे गोवर आजाराची साथ आढळून आली आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत दाट लोकवस्ती भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात कोंढवा, भवानी पेठ, येरवडा आणि आंबेगाव येथे सर्वेक्षण करण्यात आले. जानेवारी महिन्यापासून शहरात गोवर आजाराचे १२५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत

दरम्यान, सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गोवर रोखण्यासाठी त्वरित गोवर रुबेला लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रसूतिगृहात सध्या बालकांचे नियमित लसीकरण केले जात आहे. महापालिकेच्या दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोन वेळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकदा लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. त्याच प्रमाणे बांधकामांच्या ठिकाणी, जोखीमग्रस्त आणि अतिजोखीमग्रस्त ठिकाणी आणि रस्त्यांवरील बालकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनाथाश्रम, धार्मिक ठिकाणांमध्ये किती बालके आहेत, याची माहिती सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी लसीकरण वाढविण्याला आरोग्य विभागाने प्राधान्य देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:18 IST
Next Story
महापुरुषांचा अवमान केल्यास राष्ट्रद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा द्या!; उदयनराजे भोसले यांची मागणी; ३ डिसेंबरला रायगडावर आक्रोश