पुणे : महात्मा फुले वाडा परिसरात भाजप खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या वटपूजेच्या कार्यक्रमावरून पुण्यातील पुरोगामी संघटना आणि राजकीय विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर, ‘या ठिकाणी अनेक वर्षे हा कार्यक्रम होत असून, कार्यक्रमाला रीतसर परवानगी होती,’ असे प्रत्युत्तर कुलकर्णी यांनी दिले आहे.
महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक असून, वाडा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो. वाड्याच्या परिसरातील वडाच्या झाडाच्या ठिकाणी दर वर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र, तशी ती साजरी करणे, ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या विचारांच्या विरोधातील कृती असल्याचे पुरोगामी कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, गेली तीन वर्षे तेथे वटपूजनासाठी येणाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी कार्यकर्ते उपक्रम राबवितात. या पार्श्वभूमीवर, यंदा समस्त महात्मा फुले वाडा परिसर महिला गण आयोजित श्रेष्ठ वट पौर्णिमेनिमित्त वटपूजन कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी यांना सोमवारी (२९ जून) आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या वटपूजन कार्यक्रमावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.
‘महात्मा फुले वाडा राज्य शासनाने घोषित केलेले राज्य संरक्षित स्मारक आहे. हा वाडा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा आहे. या वास्तूचे ऐतिहासिक, वैचारिक आणि सामाजिक पावित्र्य जतन करणे ही पुरातत्त्व विभागाची जबाबदारी आहे. पुरातत्त्व विभागाने वाड्यात असे कार्यक्रम करण्यास बंदी घालण्याचा आदेश जानेवारी महिन्यात काढला होता. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निवेदनही प्रतिष्ठानाकडून पुरातत्त्व विभागाला देण्यात आले होते. मात्र, मुंबई कार्यालयातून पुणे कार्यालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. वाड्याच्या परिसरात मेधा कुलकर्णी यांच्या सत्काराचा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ही बाब स्मारक संरक्षण नियमांशी पूर्णपणे विसंगत आहे,’ अशी भूमिका महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानाच्या सरचिटणीस ॲड. शारदा वाडेकर यांनी मांडली.
‘महात्मा फुले वाडा हा राज्य संरक्षित वास्तू असल्याने राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. यासाठीची नियमावली राज्यघटनेच्या तरतुदींअंतर्गत तयार झाली आहे. त्यामुळे ती पाळायला हवी. धार्मिक परंपरेचा भाग म्हणून नियमांचे पालन न करणे अयोग्य आहे,’ असे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार म्हणाले.
याबाबत पुरातत्त्व विभागाच्या पुणे कार्यालयाचे सहायक संचालक विलास वाहणे म्हणाले, ‘महात्मा फुले वाड्यात गेल्या काही वर्षांपासून या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. गेल्या वर्षी कार्यक्रमावेळी दोन गटांत वाद झाले. त्यानंतर असे कार्यक्रम करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी निवेदने काही संघटनांनी दिली. त्यामुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी न करण्यासंदर्भातील पत्र पुरातत्त्व विभागाने पोलिसांना दिले होते.’
‘वटपौर्णिमेच्या काही दिवस आधी मुंबई कार्यालयाकडून त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना पुणे कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यानुसार, ‘पूर्वीपासून सुरू असलेले सण, रूढी, परंपरा आणि उत्सव साजरा करण्यास परवानगी आहे,’ असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यानुसार, पुणे कार्यालयाने सुधारित आदेश काढले आणि तसे पत्र पुणे पोलिसांना दिले,’ असे वाहणे यांनी स्पष्ट केले.
‘वटपौर्णिमेतून वृक्ष संवर्धनाचा संदेश’
‘वटपौर्णिमा हा सण निसर्गाचे महत्त्व आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देतो. निसर्गाशी नाते जोडण्याची शिकवण हा सण देत असून, प्रत्येकाने एक झाड लावून निसर्गाचे संगोपन करण्याचा निर्धार करावा,’ अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमानंतर समाजमाध्यमातून दिली होती.
वादाचे राजकीय पडसादही
‘कोथरूडमधील सगळे वड सोडून, ठरवून महात्मा फुले वाड्यात येणे, हा आचरटपणा नाही, तर शुद्ध हलकटपणा होता. त्याहीपेक्षा, एका ऐतिहासिक वास्तूमध्ये दर वर्षी हा प्रकार ठरवून हेतूपुरस्सर केला जातो. तरी, राज्याचे गृहमंत्री ठरवून त्याकडे दुर्लक्ष करतात, हे सुनियोजित कटकारस्थान आहे,’ अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमातून केली, तर कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली.
हा कार्यक्रम मी आयोजित केलेला नव्हता. मी या कार्यक्रमासाठी आमंत्रित होते. गेल्या कित्येक पिढ्यांपासून स्थानिक महिला दर वर्षी येथे वटपौर्णिमेचा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाला पुरातत्त्व विभागानेही परवानगी दिली होती. – डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप
