पुणे : ‘वेद पाठशाळा चालवणे, हे मदरसे चालवण्याइतके सोपे नाही. पण, आता आपण त्यांचे गळे आवळायला लागलो आहोत. आपल्याला पाठिंबाही मिळत आहे, ही एक जमेची बाजू आहे,’ असे विधान भाजपच्या राज्यसभा खासदार आणि वक्फ बोर्डासंबंधीच्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्या मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी केले.
‘आम्ही सारे ब्राह्मण’ व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना ‘ब्राह्मण भूषण’, तर युवा उद्योजक विनय पाचलग यांना ‘करिअर भूषण’ आणि किर्तनकार हभप अमृता करंबेळकर यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती किर्तनकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाला यंदाचा ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मंजिरी धूपकरलिखित ‘गुरू-शिष्य संवाद (दासबोध)’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाशिकच्या काळाराम मंदीराचे महंत सुधीर दास, वेदमूर्ती महेश रेखे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अमित शहाणे, संस्थेचे भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे आदी या वेळी उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या,‘आपल्या वेदांमध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये ज्ञानाचा अनमोल ठेवा आहे. ही ज्ञानसंपदा पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते-राज्यकर्त्यांनी सेतु म्हणून काम करणे अपेक्षित असते. मात्र, यापूर्वी आपला आपल्यावरचाच विश्वास उरला नव्हता. पाश्चिमात्यांना अधिक महत्त्व दिले जात होते, अशी परिस्थिती होती. पण, आता पुन्हा एकदा आपला आपल्यावर विश्वास बसू लागला आहे. त्या विश्वासाला सार्थक करणारे, राजाश्रय देणारे नेते आता आहेत. आपले प्राचीन ज्ञान आणि राज्यकर्त्यांची कृती एकत्र झाली, तर आपला देश चमत्कार घडवेल.’
सुधीर दास म्हणाले,‘ते आमची संस्कृती नष्ट करायला निघाले आहेत. त्यांना आमचेच पैसे हवेत. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) ॲक्टमध्ये (एफसीआरए) बदल केलेत, कडक नियमावली लागू केली आहे. आता आम्ही त्यांचा गळा आवळायला सुरुवात केली आहे.’
‘योगी आदित्यनाथ हनुमानगढीला घाबरतात’
‘वेद पाठशाळेंना, वैदिकांना अनुदान नाही. उत्तर प्रदेशमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. हनुमानगढीच्या प्रसादाशिवाय निवडणुकही जिंकता येत नाही. मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथसुद्धा हनुमानगढीला घाबरतात. हनुमानगढी जे सांगेल, तेच उत्तर प्रदेशमध्ये घडते. दलित समाजातून येणाऱ्या मायावतींनी संपूर्ण वेद अध्ययन केलेल्या पंडितांना दहा हजार रुपये आणि घणपाटी आहेत, त्यांना पंधरा हजार रुपये मानधन सुरु केले होते. आता महाराष्ट्राला एक ब्राह्मण मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडू आणि तोडगू काढू,’ असेही सुधीर दास यांनी सांगितले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट्स मिशनला एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी’
‘पुरुषार्थाची कमाल दाखवणाऱ्या ऋषीमुनींनी अपौरुषेय असलेले वेद जतन केले. ते प्रसारित केले. पुढच्या कित्येक पिढ्यांनंतर आजही ते मौखिक पद्धतीने जिवंत आहेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट्स मिशनच्या माध्यमातून वेद, प्राचीन ग्रंथसंपदा आणि त्यातील ज्ञानाचे भांडार पुढे नेण्याचे काम करण्यात येत आहे. हे ज्ञान आजच्या काळात कसे कालसुसंगत आहे, ते जगाला अर्पण करता येईल का, या सगळ्यांचा विचार या मिशनमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे,’अशी माहिती राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.
